सिनेमांमध्ये एखाद्या स्पेशल साँगचा समावेश करण्याचा ट्रेंड सध्या प्रचलीत आहे. त्यानुसार बऱ्याच सिनेमांमध्ये स्पेशल गाणी पाहायला मिळतात आणि या गाण्यांवर बाॅलीवूडमधील बडे स्टार्स थिरकतात. टायगर श्रॅाफ आणि आलिया भट्टही आता अशाच एका स्पेशल साँगमध्ये थिरकताना दिसणार आहेत.
करण जोहर दिग्दर्शित 'स्टुडंट आॅफ द इयर' या सिनेमाचा सिक्वेल 'स्टुडंट आॅफ द इयर २' येत असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. या सिनेमातील एका गाण्यात टायगरसोबत आलिया थिरकताना दिसणार आहे. या गाण्याचं चित्रीकरण पुढील आठवड्यात करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. या गाण्याची कोरिओग्राफी फराह खान करणार आहेत. अशा प्रकारच्या स्पेशल साँगमध्ये आलिया प्रथमच दिसणार आहे.
'स्टुडंट आॅफ द इयर' आणि आलियाचं खूप घट्ट नातं आहे. या सिनेमाद्वारेच ती बाॅलीवूडमध्ये दाखल झाली होती. त्यामुळं 'स्टुडंट आॅफ द इयर २'मध्येही तिचं दिसणं सिनेप्रेमींसाठी सरप्राइज पॅकेज ठरणार यात शंका नाही. त्यामुळं 'स्टुडंट आॅफ द इयर'च्या पहिल्या भागप्रमाणेच आता दुसऱ्या भागातही आलिया दिसणार हे नक्की. 'स्टुडंट आॅफ द इयर २'मधील आलियाचा हा कॅमिओ असला तरी 'स्टुडंट आॅफ द इयर'वर प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांसाठी ती खूप मोठी गोष्ट असल्याचं मानलं जात आहे.
'स्टुडंट आॅफ द इयर २'मध्ये टायगर श्रॅाफसोबतच अनन्या पांडे आणि तारा सुतारिया यांच्या मुख्य भूमिका आहेत. तारा आणि अनन्या यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. डान्स, फाईट्स आणि अभिनयाच्या बळावर टायगरने फिल्म इंडस्ट्रीमध्ये आज स्वत:चं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. त्याच्यासोबत दोन नवीन नायिका या सिनेमात झळकणार असल्याने प्रेक्षकांना एक अनोखी केमिस्ट्री 'स्टुडंट आॅफ द इयर २'मध्ये पाहायला मिळणार आहे. यापूर्वी 'आय हेट लव्ह स्टोरी' आणि 'गोरी तेरे प्यार में' या सिनेमांचं दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक पुनीत मल्होत्रा 'स्टुडंट आॅफ द इयर २' दिग्दर्शन करत आहेत.
हेही वाचा -
सिनेमा पहा आणि नवाजुद्दीनसोबत फोटो काढा!
बेस्टच्या प्रश्नांवर शुक्रवारी 'आमची मुंबई,आमची बेस्ट'तर्फे जनसुनावणी