Advertisement

अखेरपर्यंत अंतर्बाह्य खिळवून ठेवणारी अफलातून ‘धून’

रोमँटिक ब्लॅक कॅामेडी थ्रीलर असलेला दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा हा सिनेमा अशाच प्रकारचा आहे. योगायोग आणि घटनांचा अचूक ताळमेळ साधत राघवन यांनी एक अशी कथा सादर केली आहे, ज्याची अफलातून ‘धून’ अखेरच्या क्षणापर्यंत अंतर्बाह्य खिळवून ठेवण्यात यशस्वी होते.

अखेरपर्यंत अंतर्बाह्य खिळवून ठेवणारी अफलातून ‘धून’
SHARES

कथानकात थोडीशी अतिशयोक्ती असल्यासारखी वाटली तरी काही सिनेमे दिग्दर्शनशैलीच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडण्यात यशस्वी ठरतात. रोमँटिक ब्लॅक कॅामेडी थ्रीलर असलेला दिग्दर्शक श्रीराम राघवन यांचा हा सिनेमा अशाच प्रकारचा आहे. योगायोग आणि घटनांचा अचूक ताळमेळ साधत राघवन यांनी एक अशी कथा सादर केली आहे, ज्याची अफलातून ‘धून’ अखेरच्या क्षणापर्यंत अंतर्बाह्य खिळवून ठेवण्यात यशस्वी होते.


Andhadhun 6.jpg

चित्रपट पाहताना पडद्यावर दिसणाऱ्या कथानकाशी प्रेक्षक एकरूप होतात. मेंदूचा भुगा होईपर्यंत विचार करायला लावणारी दृश्यं पाहताना समोर काय घडतंय? आणि पुढे घडणार? याचा विचार करताना अनाहुतपणे कधी हसतात, तर कधी आश्चर्यचकीत होतात. अचानक आलेल्या एखाद्या दृश्यामुळे घाबरल्यानंतर पुढील दृश्याशी अधिक बारकाईने समरसूनही जातात. हा सर्व कथेला देण्यात आलेल्या अनोख्या ट्रीटमेंटचा खेळ आहे.

पुण्यात राहणाऱ्या दृष्टीहीन आकाशची (आयुष्यमान खुराना) ही कथा आहे. संगीतकार असलेला आकाश एका क्लिष्ट कम्पोझिशनमध्ये अडकलेला असतो. अर्धवट राहिलेली धून पूर्ण करण्यासाठी अंतर्मनावर फोकस करण्याचा प्रयत्न करत असतो. रस्ता ओलांडताना सोफी (राधिका आपटे) नावाच्या तरुणीच्या बाईकचा आकाशला धक्का लागतो आणि या कथेत प्रेमाची किनार जोडली जाते.

Andhadhun 5.jpg

सोफी ही पुण्यातील फ्रँन्सिस्को रेस्टॅारंटच्या मालकाची मुलगी असते. तिच्यामुळे आकाशला फ्रँन्सिस्को रेस्टॅारंटमध्ये पियानो वाजवत गाणं गात पाहुण्याचं मनोरंजन करण्याचं काम मिळतं. इथेच त्याची भेट जुन्या काळातील सुपरस्टार प्रमोद सिन्हा (अनिल धवन) यांच्याशी होते. ते आकाशला आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी घरी प्रायव्हेट काँन्सर्ट करण्यासाठी आमंत्रित करतात. दुसऱ्या दिवशी आकाश त्यांच्या घरी पोहोचतो आणि इथूनच कथानक एक वेगळं वळण घेतं. पुढे एका मागोमाग धक्के देत, बऱ्याचदा हृदयाची धडधड वाढवतं आणि नंतर पाहणाऱ्याच्या डोक्यातील गुंता हळूहळू सोडवत जातं.

थ्रीलरपटाच्या दृष्टिने गती खूप महत्त्वाची असते. थ्रीलरपटांमध्ये तरबेज असलेल्या राघवन यांनी पहिल्या दृश्यापासूनच चित्रपट गतीमान राहिल याची काळजी घेतली आहे. एका मागोमाग एक वेगात घडणाऱ्या घटनांमुळे चित्रपट कुठेही रेंगाळत नाही. काही ठिकाणी दोन व्यक्तिरेखांमधील मोठमोठे संवाद थोडा वेळ घेतात, पण त्याने फारसा फरक पडत नाही.

Andhadhun 4.JPG

पहिल्या दृश्यापासूनच कथानकात इतकी वेडी-वाकडी आणि उलट-सुलट वळणं आहेत की, सर्वसामान्य प्रेक्षक कधी याचा विचारही करू शकत नाही. हे लेखकांच्या टिमचं यश आहे. चित्रपटाची कथा कुठेही वास्तववादी वाटत नाही. त्यामुळे कल्पनाविलासाच्या बळावर रचलेलं एक अविश्वसनीय कथानक असंच या चित्रपटाबाबत म्हणावं लागेल. चित्रपटातील पहिल्या दृश्याची अफलातून सांगड क्लायमॅक्समध्ये घालण्यात आली आहे.

ठराविक वेळेनंतर एक अनपेक्षित धक्का आणि त्यासेाबत गडद विनोद म्हणजेच (डार्क ह्युमर) अशी या चित्रपटाची मांडणी आहे. थ्रीलरपटांमध्ये गतीइतकीच महत्त्वाची भूमिका पर्श्वसंगीताचीही असते. पडद्यावर घडणाऱ्या घटनांना पार्श्वसंगीताची अचूक साथ लाभल्याने एक अद्भुत रसायन पाहायला मिळतं.

मोहनन यांचं सुरेख कॅमेरावर्क ही जमेची बाजू आहे. संपूर्ण चित्रपटात वाजणारा पियानोचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. अमित त्रिवेदीच्या आवाजातील ‘नैना दा क्या कसूर...’, अरिजीत सिंगच्या आवाजातील ‘वो लडकी...’, शादाब-अल्तामश यांच्या आवाजातील ‘ओ भाई रे...’ ही गाणी चांगली आहेत. सिनेमाचा वेग मंदावणार नाही याची खबरदारी संकलन करताना घेण्यात आली आहे.

Andhadhun 2.jpg

वेगळ्या शैलीतील सिनेमा करणारा अभिनेता ही आयुष्यमान खुरानाने आजवर जपलेली आपली छबी या चित्रपटातही कायम राखली आहे. नेत्रहिन नायकाची भूमिका साकारताना त्या व्यक्तिरेखेला कुठेही अतिरंजीतपणाचा स्पर्श होणार नाही याची काळजी आयुष्यमानने घेतली आहे. 

तब्बूच्या आजवरच्या करियरमधला हा सर्वात वेगळा, दमदार चित्रपट आणि परफॅार्मंस आहे. राधिका आपटेने काहीशा बोल्ड शैलीत आजच्या काळातील तरुणी साकारली आहे. ‘सैराट’ आणि ‘न्यूड’नंतर छाया कदम यांनी या चित्रपटातील छोट्याशा भूमिकेतही लक्षवेधी अभिनय केला आहे. अनिल धवन, झाकीर हुसेन, अश्विनी काळसेकर, मानव विज या कलाकारांनी चांगलं काम केलं आहे.

अमूक एका कारणासाठीच हा चित्रपट पाहायला हवा, असं सांगता येणार नाही. सर्वार्थाने विविधता जपत खुर्चीला खिळवून ठेवणारा अनुभव घेण्यासाठी हा चित्रपट पाहायला हवा. कारण असे चित्रपट कधीतरीच बनत असतात.


दिग्दर्शक : श्रीराम राघवन

लेखक : श्रीराम राघवन, अरिजीत बिस्वास, पूजा लढा सूरती, योगेश चांदेकर, हेमंत राव

कलाकार : आयुष्यमान खुराना, राधिका आपटे, तब्बू, छाया कदम, अनिल धवन, झाकीर हुसेन, अश्विनी काळसेकर, मानव विज



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा