Advertisement

पानिपतचा ट्रेलर पाहून आली बाजीराव मस्तानी, पद्मावतची आठवण

पानिपतची रक्तरंजित लढाई आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. अनेकांना सदाशिवरावांच्या भूमिकेतील अर्जुन खटकला आहे.

पानिपतचा ट्रेलर पाहून आली बाजीराव मस्तानी, पद्मावतची आठवण
SHARES

पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या जखमा मराठ्यांच्या मनात आजही जिवंत आहेत. या युद्धात जवळपास ४० हजार मराठी योद्धे, स्त्रिया आणि पुरुष मरण पावले होते. तर २२ हजार मराठी युद्धकैदी गुलाम म्हणून अहमदशहा अब्दालीनं आपल्याबरोबर अफगाणिस्तानला नेले होते. पानिपतची रक्तरंजीत  लढाई आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

जोधा अकबर, मोहेंजोदारो, लगान अशा ऐतिहासिक चित्रपटानंतर आशुतोष गोवारीकर (Ashutosh Gowariker) पेशवाईचा इतिहास पडद्यावर दाखवण्यास सज्ज झाले आहेत. १७६१ साली घडलेल्या या पानिपतच्या लढाईमुळे मराठेशाहीची पाळेमुळे हलली होती. मंगळवारी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.

भव्य-दिव्य सेट

चित्रपटाची भव्यता ट्रेलरची सुरुवात पाहता लक्षात येते. ट्रेलरच्या सुरुवातीलाच पानिपतच्या रणभूमीमध्ये एकमेकांसमोर उभे ठाकलेले सैन्य व लढाई दिसते. या पहिल्याच काही शॉट्सवरून चित्रपट किती भव्य असेल याचा अंदाज येतो. त्यानंतर हळूहळू पेशवाई उलगडत जाते. चित्रपटात सदाशिवरावांच्या भूमिकेत अर्जुन कपूर, अहमद शाह अब्दालीच्या भूमिकेत संजय दत्त तर क्रिती सनॉन पार्वतीबाईंची भूमिकेत दिसणार आहेत. ट्रेलरमधील संवादही दमदार आहेत. पण ट्रेलर पाहिल्यावर कुठे ना कुठे बाजीराव मस्तानी, पद्मावतसारख्या चित्रपटांची आठवण येते. कारण चित्रपटांचे काही शॉट्स सारखे आहेत. त्यामुळे त्यात नावीण्य असं काहीच नाही.

नेटकऱ्यांची टीका

अनेकांना सदाशिवरावांच्या भूमिकेतील अर्जुन खटकला आहे. अर्जुनऐवजी अन्य अभिनेत्याचा विचार गोवारीकर यांनी करायला हवा होता. अर्जुनमुळे सिनेमा पडणार अशाप्रकारच्या अनेक प्रतिक्रिया गोवारीकर यांच्या ट्विटवर दिल्या आहेत.

'या' दिवशी प्रदर्शित

अर्जुन, क्रिती आणि संजय व्यतिरिक्त या चित्रपटात पद्मिनी कोल्हापुरे, मोहनीश बहल, कुणाल कपूर, सुहासिनी मुळे, रवींद्र महाजनी, झीनत अमान, गश्मीर महाजनी आदी कलाकार महत्वाच्या भूमिकेत आहेत. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित या सिनेमाचे संगीत अजय-अतुल यांनी दिले आहे. चित्रपटामधील गीते जावेद अख्तर यांची आहेत. कला दिग्दर्शन नेहमी प्रमाणेच नितीन चंद्रकांत देसाई यांचे आहे. असा हा बहुप्रतीक्षित चित्रपट येत्या ६ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.हेही वाचा

'पत्नी' आणि 'ती'च्यात अडकलेला कार्तिक आर्यन

कधी काळी राणा दा होता बॉलिवूडमध्ये बॅकग्राऊंड डान्सर


संबंधित विषय
Advertisement