Movie Review : फेक एन्काऊंटरच्या जाळ्यात अडकलेल्या सच्च्या पोलिसांचा लढा

दिग्दर्शक निखिल आडवाणी यांनी या चित्रपटात फेक एन्काऊंटरच्या जाळ्यात अडकलेल्या प्रामाणिक पोलिसांचा लढा सादर केला आहे.

  • Movie Review : फेक एन्काऊंटरच्या जाळ्यात अडकलेल्या सच्च्या पोलिसांचा लढा
  • Movie Review : फेक एन्काऊंटरच्या जाळ्यात अडकलेल्या सच्च्या पोलिसांचा लढा
  • Movie Review : फेक एन्काऊंटरच्या जाळ्यात अडकलेल्या सच्च्या पोलिसांचा लढा
  • Movie Review : फेक एन्काऊंटरच्या जाळ्यात अडकलेल्या सच्च्या पोलिसांचा लढा
  • Movie Review : फेक एन्काऊंटरच्या जाळ्यात अडकलेल्या सच्च्या पोलिसांचा लढा
  • Movie Review : फेक एन्काऊंटरच्या जाळ्यात अडकलेल्या सच्च्या पोलिसांचा लढा
SHARE

सत्य घटनांवर आधारित असलेले चित्रपट नेहमीच लक्ष वेधून घेतात. हा चित्रपटही वास्तवात घडलेल्या सत्य घटनांवर आधारित आहे. दिग्दर्शक निखिल आडवाणी यांनी या चित्रपटात फेक एन्काऊंटरच्या जाळ्यात अडकलेल्या प्रामाणिक पोलिसांचा लढा सादर केला आहे. पोलिसांनाही किती भोगावं लागतं, कर्तव्यदक्ष पोलिसांना कशा परिस्थितीला सामोरं जात आपलं कर्तव्य बजावावं लागतं आणि अखेरीस त्यांच्या पदरी काय येतं? याचं चित्रण 'बाटला हाऊस'मध्ये पहायला मिळतं.

मनोरंजक तत्त्वांची जोड

चित्रपटाचं कथानक वास्तववादी आहे. काही ठिकाणी त्याला मनोरंजक तत्त्वांची जोड देऊन चित्रपटासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला असला तरी चित्रपट कुठेही आपल्या मूळ हेतूपासून ढळत नाही. हीच या चित्रपटाची खासियत मानावी लागेल. बारीकसारीक तपशीलांसह सादर केलेलं बाटला हाऊसचं प्रकरण निखिल आडवाणी यांनी उत्तम कलाकारांच्या साथीनं अत्यंत सावधपणे पडद्यावर मांडलं आहे. मूळ प्रकरणाला कुठेही धक्का लागणार याची काळजीही घेण्यात आली आहे. त्यामुळेच सच्च्या पोलिसांचा हा लढा मनाला भावतो.

सिरीयल बॅाम्बस्फोट

२००८ मध्ये जयपूर, अहमदाबाद, वाराणसी, दिल्ली आणि हैदराबादमध्ये सिरीयल बॅाम्बस्फोट घडवले गेले होते. आयएम म्हणजेच इंडियन मुजाहिदीन या अतिरेकी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. हल्ला होण्यापूर्वी १० मिनिटं अगोदर ईमेलद्वारे याबाबतची माहिती कळवण्यात आलेली होती. या हल्ल्याशी संबंधित असलेले अतिरेकी दिल्लीतील बाटला हाऊसमध्ये दडले असल्याची माहिती १९ सप्टेंबर २००८ या दिवशी एसीपी संजीव कुमार यादव (जॅान अब्राहम) यांच्या टीमला मिळते. एकीकडे संजीवचं वैवाहिक जीवन संपुष्टात येण्याच्या मार्गावर असतं, तर दुसरीकडं चार अतिरेकी बाटला हाऊसमध्ये असल्याचं समजतं. आपण येईपर्यंत कोणतीही अॅक्शन घेऊ नका असं स्पष्ट सांगूनही स्पेशल सेल आॅफिसर केके (रवी किशन) आणि त्यांचे साथीदार अतिरेक्यांना अटक करण्यासाठी बाटला हाऊसमध्ये घुसतात. या एन्काऊंटरमध्ये दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातलं जातं, एक पकडला जातो, एक पळ काढतो. यात केकेला प्राण गमवावा लागतो. त्यानंतर संजीव यांच्या टीमनं केलेलं एन्काऊंटर फेक असून, ओखला युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना नाहक टार्गेट करण्यात येत असल्याचे आरोप त्यांच्या टीमवर केले जातात. या प्रकरणात ते स्वत:सोबतच आपल्या टीमला कसं निर्दोष सिद्ध करतात त्याची कथा या चित्रपटात आहे.

वास्तववादी सिनेमा

वास्तववादी लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलेला वास्तववादी सिनेमा असं या चित्रपटाचं प्रथमदर्शी वर्णन करायला हवं. एन्काऊंटरसह एकूणच बाटला हाऊस या प्रकरणाचा बारीकसारीक तपशील पटकथेत योग्य रीतीनं मांडला आहे. त्यामुळंच सच्च्या पोलिस अधिकाऱ्यांचा हा लढा मनाला भिडतो. चित्रपटातील संवाद अर्थपूर्ण आणि मार्मिक आहेत. काही ठिकाणी अनावश्यक एन्टरटेन्मेंट व्हॅल्यू अॅड करण्याचा प्रयत्न केल्यानं या लढ्याचा प्रभाव काहीसा कमी झाल्यासारखा वाटतो, पण एकूणच सादरीकरणात वेगळेपण जाणवतं. निखिल आडवाणी एक वेगळ्या शैलीचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटातून ते पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. संजीव कुमार यांच्या मानसिक तणावाचे पैलू यात अधिक स्पष्टपणे सादर करण्यात आले आहेत.

पटकथेचं यश

मानसिक तणावाखाली वावरणारे संजीव कुमार पुढल्या दृश्यात काही विपरीत तर करणार नाहीत ना असं कित्येकदा वाटत राहतं. हे पटकथेचं यश मानावं लागेल. राजकीय परिस्थिती आणि सिस्टीमपुढं हतबल न होता, दबाव सहन न झाल्यानं आत्महत्या न करता पोलिसांनी कशाप्रकारे आपल्या मुद्द्यांवर ठाम रहायला हवं, आपल्यासाठीही लढायला हवं हे हा चित्रपट सांगतो. कोणत्याही परिस्थितीत शस्त्र न टाकता सत्य परिस्थिती जगासमोर आणायला हवी यासाठी प्रेरीत करणारा हा चित्रपट आहे. संपूर्ण सिस्टीम विरोधात असूनही काही पोलिस अधिकाऱ्यांनी संजीव कुमार यांच्यावर दाखवलेला विश्वास वाखाणण्याजोगा आहे.

एक प्रकरण जगासमोर 

आजही परिस्थिती बदललेली नाही. लाचखोर वाऱ्यावर फिरतात आणि प्रामाणिक पोलिसांना सिस्टीमशी झगडत स्वत:ची नोकरी आणि कुटुंब सांभाळावं लागतं. बाटला हाऊसच्या निमित्तानं देशातील केवळ एक प्रकरण जगासमोर आलं आहे. सच्च्या पोलिसांच्या जीवावर बेतलेली अशी कित्येक प्रकरणं असतील जी अद्याप प्रकाशझोतात आलेलीच नाहीत, जी जगासमोर येणं गरजेचं आहे. नोरा फतेहीवर चित्रीत करण्यात आलेलं 'साकी साकी...' हे रिक्रिएटेड साँग चांगलं झालं आहे. 'जाको राखे...' हे गाणंही ठीक आहे. कॅमेरावर्क आणि कला दिग्दर्शन अफलातून आहे. पळालेल्या अतिरेक्याला पडकडण्यासाठी निजामपूरला संजीव कुमार यांची टीम जाते ती दृश्ये खूप चांगली झाली आहेत.


जॅान अब्राहमचं एक वेगळंच रूप या चित्रपटात पहायला मिळतं. यात जॅान जरी पोलिस अधिकारी असला तरी वास्तव जीवनातील एक व्यक्तिरेखा आपण साकारत असल्याचं भान त्यानं कायम ठेवलं आहे. मानसिक संतुलन ढासळण्याच्या दृश्यात त्यानं जीव ओतला आहे. मृणाल ठाकूरनं पुन्हा एकदा अप्रतिम अभिनयाचं दर्शन घडवत लक्ष वेधून घेतलं आहे. तिचा रोल फार मोठा नाही, पण त्यातही तिनं कमालीचं काम केलं आहे. रवी किशनची भूमिकाही छोटी असली तरी मनाला चटका लावून जाणारी आहे. मनीष चौधरी, राजेश शर्मा, सोनम अरोरा, सहिदूर रेहमान, क्रांती प्रकाश झा, आलोक पांडे, फैझल खान, निरंजन जाधव यांनीही चांगलं काम केलं आहे.


सच्च्या पोलिसांनी सिस्टीमविरोधात प्रामाणिकपणे दिलेला लढा पोलिसांनाही कित्येकदा कशा प्रकारच्या दिव्यातून जावं लागतं याची जाणीव करून देणारा आहे. आस हरवलेल्या अनेकांना प्रेरणादायी ठरू शकणारा हा लढा अवश्य पहायला हवा.


दर्जा : ****

......................................

निर्माते : भूषण कुमार, दिव्या कुमार खोसला, क्रिशन कुमार, मोनिषा आडवाणी, मधू भोजवानी, जॅान अब्राहम, संदीप लेझील

लेखक : रितेश शाह

दिग्दर्शक : निखिल आडवाणी

कलाकार : जॅान अब्राहम, मृणाल ठाकूर, रवी किशन, मनीष चौधरी, राजेश शर्मा, सोनम अरोरा, सहिदूर रेहमान, क्रांती प्रकाश झा, आलोक पांडे, फैझल खान, निरंजन जाधव

संबंधित विषय
ताज्या बातम्या