Coronavirus cases in Maharashtra: 212Mumbai: 85Islampur Sangli: 25Pune: 24Nagpur: 14Pimpri Chinchwad: 12Kalyan: 6Ahmednagar: 5Thane: 5Navi Mumbai: 4Yavatmal: 4Vasai-Virar: 4Satara: 2Panvel: 2Ulhasnagar: 1Aurangabad: 1Ratnagiri: 1Sindudurga: 1Kolhapur: 1Pune Gramin: 1Godiya: 1Jalgoan: 1Palghar: 1Buldhana: 1Nashik: 1Gujrat Citizen in Maharashtra: 1Total Deaths: 8Total Discharged: 35BMC Helpline Number:1916State Helpline Number:022-22694725

Movie Review: कसा सहू हा 'साहो'?

या चित्रपटात बाकी सर्व आहे, पण प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आवश्यक असणारी मुद्देसूद आणि उत्कंठावर्धक कथाच मिसींग आहे. त्यामुळं सुजीत यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट शेवटपर्यंत कसा सहन करायचा हा प्रश्न सिनेमा पाहताना पडतो.

SHARE

'नाव मोठं अन लक्षण खोटं' ही म्हण मराठीत चांगलीच प्रचलित आहे. कोट्यवधी रुपये उधळून मोठ्या गाजावाजासह प्रदर्शित झालेल्या 'साहो'बाबतही असंच काहीसं म्हणता येईल. 'बाहुबली'च्या यशानंतर प्रभासच्या या चित्रपटाकडून खूप अपेक्षा वाढल्या होत्या, पण हा चित्रपट त्या पूर्ण करू शकलेला नाही. या चित्रपटात बाकी सर्व आहे, पण प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी आवश्यक असणारी मुद्देसूद आणि उत्कंठावर्धक कथाच मिसींग आहे. त्यामुळं सुजीत यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला हा चित्रपट शेवटपर्यंत कसा सहन करायचा? हा प्रश्न सिनेमा पाहताना पडतो.

चित्रपट पूर्णत: दक्षिणात्य शैलीतील आहे. दक्षिणात्य प्रेक्षकांनाच नजरेसमोर ठेवून बनवण्यात आलेला आहे. लॅाजिकचा जराही विचार केलेला नाही. मनोरंजनाचे सर्व मसाले ठासून भरण्याच्या नादात चित्रपटासाठी आवश्यक असलेला मूळ गाभाच हरवलेला आहे हे दिग्दर्शकांच्या लक्षात आलेलं नाही. चकचकीतपणा, अॅक्शन्स, पळापळ, महागडी लोकेशन्स, जबरदस्त स्पेशल इफेक्ट्स या सर्व गोष्टी या चित्रपटात ठासून भरल्या आहेत, पण त्याचा काहीच फायदा होत नाही.


चित्रपटाची सुरुवात वाजी नावाच्या शहरात राहणाऱ्या इंटरनॅशनल गँग लीडर रॅायच्या (जॅकी श्रॅाफ)इंट्रोडक्शनपासून होते. रॅाय मुंबईत येतो आणि तिथेच एका अपघातात त्याचा मृत्यू होतो. दुसरीकडं मुंबईतच एक चोर कोट्यवधी रुपयांच्या चोऱ्या करत असतो आणि त्याचा शोध घेण्यासाठी एका खास पोलीस अधिकाऱ्याला नियुक्त केलं जातं. हॅकर डेव्हिडच्या (मुरली शर्मा)सांगण्यावरून चोराला पकडण्याची जबाबदारी स्पेशल आॅफिसर अशोक चक्रवर्तीकडं (प्रभास)चोराला जेरबंद करण्याची जबाबदारी सोपवण्यात येते. चोरीचा छडा लावण्यासाठी त्याच्या टीममध्ये आॅफिसर अमृता नायरची (श्रद्धा कपूर)एंट्री होते. दोघेही त्या चोराच्या (नील नितीन मुकेश)मागावर असतात. चोराला चोरी करताना रंगेहाथ पडकण्याचा त्यांचा प्लॅन असतो. या दरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. चोराला पकडत असताना एक वेगळंच सत्य समोर येतं जे चक्रावून टाकतं. त्यानंतर पडद्यावर जे घडतं ते मुकाटपणं पाहण्यावाचून गत्यंतर रहात नाही.

१७४ मिनिटं ही चित्रपटाची लांबी खूपच मोठी आहे. कथानकाचा जीव केवढा आणि ते दाखवण्यासाठी किती वेळ घ्यायला हवा हे गणित अक्षरश: चुकलं आहे. त्यामुळं हा चित्रपट म्हणजे पालीला ओढून मगर बनवण्याचा केलेला प्रयत्न असं म्हणावं लागेल. लॅाजिक नावाचं काहीतरी असतं याचं भान राखण्याची गरज होती. एक चोर थेट एखाद्या स्पेशल पोलीस आॅफिसरची जागा घेतो आणि त्या चोराच्या जागी पोलीस आॅफिसरला उभा करतो हे नेमकं काय आहे ? त्याचा विचार करून डोकं दुखू लागतं. चोरानं पोलिसाची जागा घेणं इथपर्यंत ठीक आहे, पण पोलिसानं चोराच्या जागी उभं राहिपर्यंत तो नशेत होता की दिग्दर्शक? हे कोडं अखेरपर्यंत सुटत नाही.


पुढं पुढं तर कोड्यांचा डोंगरच उभा ठाकतो. सुरुवातीला पोलीस बनून आलेली व्यक्ती नंतर चोर असल्याचं समजतं, पण मध्यंतरानंतर तर तोच मालक असल्याचं सत्य समोर येतं. बरं हा चोर एखाद्या सराईत चोराप्रमाणं चोरी करतानाही दिसत नाही. पोलीस असलेल्या नायिकेला नायक चोर असल्याचं समजूनही त्याला साथ देते हे गणित आकलनापलीकडलं आहे. एकाच चित्रपटात सारं काही दाखवण्याच्या नादात दिग्दर्शकानं एक असा खेळ मांडला आहे जो या चित्रपटाचा खेळखंडोबा करतो. इंटरनॅशलन गँगमधील कौटुंबिक वैर, गँग लिडरच्या पश्चात त्याच्या खुर्चीसाठी खेळले जाणारे डावपेच, तिजोरी उघडण्यासाठी आवश्यक असणारा ब्लँक बॅाक्सचा शोध, त्याच ब्लँक बॅाक्सची चोरी करण्याचा प्लॅन, तो मिळवण्यासाठी पळापळ आणि त्यात नायक-नायिकेचा रोमांस घुसवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकानं केला आहे.

या चित्रपटाच्या जमेच्या बाजूंबद्दल बोलायचं झालं तर चकचकीतपणा, नयनरम्य लोकेशन्स, अप्रतिम कॅमेरावर्क, धडाकेबाज स्टंट्स, अफलातून स्पेशल इफेक्ट्स यांचा उल्लेख करता येईल. संकलन कामचलाऊ असून, गाणीही फारशी लक्षात राहण्याजोगी नाहीत. गाणी केवळ रिकाम्या जागा भरण्याचं काम करतात. फाईट सिक्वेन्स चांगले असले तरी ते खूप लांबल्यानं कंटाळा येतो. मुख्य म्हणजे कथानक संथ गतीनं पुढं सरकल्यानं पुढल्या दृश्यात काय पहायला मिळेल याचा अंदाज बांधणं सहज जक्य होतं. शेवट इतका लांबला आहे की कधी एकदा सिनेमा संपतो आणि बाहेर पडतो असं वाटू लागतं. हे दिग्दर्शकाच्या रूपात सुजीत यांचं अपयश आहे.


'बाहुबली'च्या यशानंतर प्रभास या चित्रपटात सपशेल फेल ठरला आहे. हिंदी भाषेवर प्रभुत्व नसणं आणि चेहऱ्यावरील थकलेला भाव यामुळं त्याच्याकडून ज्या नायकाची अपेक्षा होत्या पूर्ण होत नाहीत. श्रद्धा कपूरची व्यक्तिरेखा कागदावरच व्यवस्थित उतरवण्यात आलेली नसल्यानं पडद्यावरही तिचा वापर केवळ ग्लॅमरचा तडका देण्यासाठीच केल्यासारखा वाटतो. श्रद्धानं आपली भूमिका नेटकेपणानं साकारली असली तरी फार काही वेगळं करण्यासाठी तिला वाव नव्हता. मुरली शर्माला पुन्हा एकदा एक चांगली भूमिका मिळाली असून, त्यानं ती अत्यंत सहजपणं साकारली आहे. चंकी पांडे आणि महेश मांजरेकर यांनी साकारलेले खलनायकही चांगले झाले आहेत. बऱ्याच दिवसांनी दिसलेली मंदिरा बेदीही थकल्यासारखी वाटली. नील नितीन मुकेशच्या व्यक्तिरेखेच्या बाबतीतही श्रद्धासारखीच गफलत झाल्यानं तो फारसा प्रभावी वाटत नाही.

प्रचंड हवा झालेला हा चित्रपट पाहताना सहनही होईना आणि सांगताही येईना अशी अवस्था होते. दक्षिणात्य शैलीतील हा लॅाजिकलेस सिनेमा केवळ चकचकीतपणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी स्वत:च्या रिस्कवर पहावा. सावधगिरीची उपाययोजना म्हणून सोबत डोकेदुखीची गोळी जरूर ठेवावी.

दर्जा : **
..........................................

निर्माते : वामसी कृष्णा रेड्डी, प्रमोद उप्पलापथी, भूषण कुमार

दिग्दर्शक : सुजीत

कलाकार : प्रभास, श्रद्धा कपूर, मुरली शर्मा, चंकी पांडे, जॅकी श्रॅाफ, महेश मांजरेकर, नील नितीन मुकेश, वेनेला किशोर, अरुण विजय, प्रकाश बेलवडी, मंदिरा बेदी, टिनू आनंदहेही वाचा-

‘सांड की आंख’चा वेध घेणार तापसी-भूमी

महेशचं देवेंद्रला 'दबंग' गिफ्टसंबंधित विषय
ताज्या बातम्या