Advertisement

शाहरुख खान बटला, तर अक्षय कुमार व्हिलन, २०१८ मध्ये 'या' चित्रपटांचा धमाका!


शाहरुख खान बटला, तर अक्षय कुमार व्हिलन, २०१८ मध्ये 'या' चित्रपटांचा धमाका!
SHARES

रईस, टायगर जिंदा है, गोलमान अगेन, काबिल, जॉली-एलएलबी असे अनेक चित्रपट २०१७ साली प्रदर्शित झाले. या चित्रपटांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. तर २०१७ या वर्षात ट्यूबलाईट, जब हॅरी मेट सेजल, जग्गा जासूस हे चित्रपट प्रेक्षकांसाठी निराशाजनक ठरले. बादशाहो, रंगूनओके जानू सारख्या चित्रपटात सुपरस्टार्स असूनही प्रेक्षकांनी या चित्रपटांकडे पाठ फिरवली.

अगदी मोजक्याच चित्रपटांनी 2017 साली चांगली कमाई केली. असे असले तरी २०१८ मात्र धमाकेदार असणार आहे, यात काही शंका नाही. त्यामुळे प्रेक्षकांना प्रतिक्षा आहे ती २०१८ मध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची! २०१८ या वर्षात देखील मोठ्या बॅनरचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये शाहरुख खान, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, सलमान खान, अनुष्का शर्मा यांच्या चित्रपटांचा यात समावेश आहे. अॅक्शन, ड्रामा, रोमान्स अशा वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरतील.


पद्मावती

बहुचर्चित असा 'पद्मावती' चित्रपट २०१८ साली प्रदर्शित होणार आहे. 'पद्मावती' चित्रपट १ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. मात्र चित्रपटावर निर्माण झालेल्या वादानंतर आणि सेन्सॉर बोर्डानं सुचवलेल्या बदलांनंतर चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं.



कर्णीसेना आणि काही राजकीय पक्षांनी चित्रपटातल्या काही दृश्यांवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे चित्रपट २०१८ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 


ड्वार्फ

'जब हॅरी मेट सेजल'च्या अपयशानंतर शाहरुख खान एका वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. शाहरूख खाननं बहुतांश चित्रपटात रोमँटिक भूमिका साकारल्या आहेत. पण 'ड्वार्फ'मधली त्याची भूमिका ही हटके असणार आहे



चित्रपटात शाहरुख एका 'ड्वार्फ' म्हणजेच ठेंगण्या माणसाची व्यक्तीरेखा साकारणार आहे. त्याच्यासोबत अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ झळकणार आहेत. २१ डिसेंबर २०१८ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


संजय दत्त बायोपिक

संजय दत्तच्या जीवनावर आधारित चित्रपट २०१८ साली प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूरनं संजय दत्तची भूमिका साकारली आहे. संजय दत्तच्या जीवनाचे विविध पैलू या चित्रपटाद्वारे उलगडणार आहेत.



राजकुमार हिरानी दिग्दर्शित या चित्रपटात दिया मिर्झा, सोनम कपूर, अनुष्का शर्मा आणि विकी कौशल हे देखील प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाचं नाव अजून जाहीर झालं नसून ३० मार्च २०१८ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


ठग्ज ऑफ हिंदुस्तान

अमिताभ बच्चन, आमीर खान, कतरिना कैफ आणि फातिमा शेख अशी तगडी स्टारकास्ट असलेला 'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे



यशराज बॅनरखाली २०१८ मध्ये दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. विजय कृष्ण आचार्य हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.


.

रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या मुख्य भूमिका असलेला .० देखील २०१८ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



स्पेशल इफेक्ट्सचा या चित्रपटात मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. एस. शंकर दिग्दर्शित हा चित्रपट जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार आहे.


पॅडमॅन

अक्षय कुमारची प्रमुख भूमिका असणारा आणखी एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. २६ जानेवारी २०१८ ला 'पॅडमॅन' हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



कमी किंमतीत सॅनिटरी नॅपकिन बनवणाऱ्या अरणांचलम या व्यक्तीच्या आयुष्यावर हा सिनेमा आधारित आहे. चित्रपटात सोनम कपूर आणि राधिका आपटे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.


राझी



'सेहमत' या कादंबरीवर आधारित 'राझी' हा चित्रपट ११ मे २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे. जम्मू काश्मीरच्या परिस्थितीवर आधारित या चित्रपटात आलिया भट आणि विकी कौशल हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेघना गुलझार करत आहेत.


वीरे दी वेडिंग

शाही भारतीय लग्नसोहळे यावर आधारित 'वीरे दी वेडिंग' हा शशांक घोष यांचा चित्रपट १८ मे २०१८ रोजी प्रदर्शित होणार आहे



करीना कपूर खान, सोनम कपूर, स्वरा भास्कर, शिखा तलसानिया आणि सुमीत व्यास यांच्या या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.  


मणिकर्णिका

कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 'मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झांसी' या चित्रपटासाठी कंगनानं घोडेस्वारी आणि तलवारबाजीचं प्रशिक्षणही घेतलं आहे.



तिच्यासोबत या चित्रपटात अंकिता लोखंडे आणि वैभव तत्त्ववादी झळकणार आहेत. २७ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.


रेस ३

दरवर्षीप्रमाणे सलमान खान २०१८ मध्ये ईदला चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.



ईदच्या दिवशी सलमानचा 'रेस ३' प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत, बॉबी देओल, जॅकलिन फर्नांडिस आणि डेझी शाह प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.


हिचकी

मोठ्या ब्रेकनंतर राणी मुखर्जी 'हिचकी' या चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. सिद्धार्थ मल्होत्रा या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



केदारनाथ, गोल्ड, १०२ नॉट आऊट, संदीप और पिंकी फरार, फन्नेखान, परी, वरुण धवनचा 'ऑक्टोबर', अजय देवगणचा 'रेड', आलिया-रणवीर सिंग जोडीचा 'गली बॉय', शाहीद कपूरचा 'बत्ती गुल, मीटर चालू' अशी मोठी लिस्टच आहे. हे चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर जादू करतात की नाही, हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. पण २०१८ मध्ये प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन होणार, हे मात्र नक्की!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा