Advertisement

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान काळाच्या पडद्याआड

चित्रपट, जाहिराती, मराठी तसेच इंग्रजी रंगभूमीवर वेगवेगळया भूमिकांमधून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते म्हणून त्यांची विशेष ओळख होती. ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांच्या निधनामुळं संपूर्ण मराठी, हिंदी यांसारख्या विविध क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

ज्येष्ठ विनोदी अभिनेते किशोर प्रधान काळाच्या पडद्याआड
SHARES

आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे प्रसिद्ध अभिनेते किशोर प्रधान यांचं वयाच्या ८३ व्या वर्षी निधन झालं. चित्रपट, जाहिराती, मराठी तसेच इंग्रजी रंगभूमीवर वेगवेगळया भूमिकांमधून प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची छाप पाडणारे अभिनेते म्हणून त्यांची विशेष ओळख होती. ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांच्या निधनामुळे सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त होत आहे.


बालपणीच बाळकडू

ज्येष्ठ अभिनेते किशोर प्रधान यांचा जन्म नागपूरमध्ये झाला असून लहानपणी घरातूनच त्यांना अभिनयाचे बाळकडू मिळालं. त्यांची आई मालतीताई प्रधान या नाटक क्षेत्रात काम करत असल्यानं त्यांनाही अभिनयाची आवड लागली. अभिनयाची आवड असताना त्यांनी शिक्षण कधीच अर्धवट सोडलं नाही. नागपूरच्या मॉरिस महाविद्यालयातून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी अर्थशास्त्रातून एम.ए केलं. त्यानंतर 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस' (टीस)मधून दोन वर्षांची रिसर्च स्कॉलरशिप आणि मास्टर ऑफ सोशल सायन्सेस ही पदवी त्यांनी मिळवली. 



रंगभूमी गाजवली

शिक्षण घेत असतानाही त्यांनी कॉलेजातील विविध स्पर्धा, एकांकिका आणि नाटक क्षेत्रात काम करायला सुरूवात केली. नाटकाची पुढे आवड निर्माण झाल्यानं त्यांनी हौशी नाटकवेड्यांना घेऊन 'नटराज' ही संस्था काढली. या संस्थेच्या माध्यमातून अनेक नाटक त्यांनी रंगभूमीवर सादर केली.  यासोबतच 'हॅटखाली डोके असतेच असे नाही', ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘हनिमून झालाच पाहिजे’ ‘जेव्हा यमाला डुलकी लागते’, ‘ती पाहताच बाला’, ‘ब्रह्मचारी असावा शेजारी’, ‘मालकीण मालकीण दार उघड’, ‘लागेबांधे’, ‘लैला ओ लैला’, ‘हँड्स अप’, ‘संभव असंभव’ यांसारख्या विविध नाटकांत एकापेक्षा एक भूमिका रंगवून रंगभूमी गाजवली.


वेगळी ओळख

याशिवाय 'शिक्षणाचा आयचा घो', 'लालबाग परळ', 'भिंगरी', 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' यांसारख्या विविध मराठी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांच्या लक्षात राहतील अशा भूमिका साकारल्या. तसंच 'लगे रहो मुन्नाभाई' या चित्रपटातील खट्याळ आजोबा, 'जब वुई मेट' चित्रपटातील स्टेशन मास्तर यातील भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या आहेत. विशेष म्हणजे पत्नी शोभासोबत त्यांनी दूरदर्शन वाहिनीवरील 'गजरा' कार्यक्रमातही काम केलं होतं. तसंच भरत दाभोळकर यांच्या इंग्लिश चित्रपटातही त्यांनी काम केल होतं. आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण करणारे म्हणून किशोर प्रधान यांची विशेष ओळख होती. 




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा