Advertisement

फळ विक्रेता ते अभिनेता, असा होता 'ट्रॅजेडी किंग'चा जीवनप्रवास

बुधवारी ७ जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून शोक व्यक्त केला जातोय. जाणून घेऊयात ट्रॅजेडी किंगचा जीवनप्रवास...

फळ विक्रेता ते अभिनेता, असा होता 'ट्रॅजेडी किंग'चा जीवनप्रवास
SHARES

चित्रपटसृष्टीची जिवंत दंतकथा म्हणून ख्याती असलेल्या दिलीपकुमार (Dilip Kumar) यांचे वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालं आहे. बुधवारी ७ जुलै रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधून (Bollywood) शोक व्यक्त केला जातोय. जाणून घेऊयात ट्रॅजेडी किंग जीवनप्रवास...

चित्रपटसृष्टीतील पहिले खान

अभिनेते दिलीपकुमार हे मूळचे पेशावरचेच. या शहरातील किस्सा ख्वानी बाजारातील मोहल्ला खुदादाद इथल्या निवासस्थानी ११ डिसेंबर १९२२ रोजी दिलीपकुमार यांचा जन्म झाला.

दिलीप साहेबांचे मूळ नाव मोहंमद युसूफ खान. पेशावरमधील त्यांच्या कुटुंबामध्ये हिंडको ही भाषा बोलली जात असे. दिलीपकुमार यांच्यासह १२ भावंडं होती.

दिलीपकुमार यांच्या वडिलांचं नाव लाला गुलाम सरवार. ते फळांचे व्यापारी होते. त्यांच्या पेशावर आणि महाराष्ट्रातील नाशिकजवळील देवळाली इथं मोठ्या फळबागा होत्या. १९२०च्या दशकाच्या अखेरीस दिलीपकुमार यांचे कुटुंबीय मुंबईला आले आणि इथेच स्थायिक झाले.

फळ विक्रेता ते अभिनेता

पुण्यातल्या सिरका इथं कँटीन सप्लायर म्हणून दिलीपकुमार यांनी १९४० मध्ये कामाला सुरुवात केली होती. याशिवाय त्यांनी आपल्या वडिलांचा फळाचा व्यवसायसुद्धा सुरू ठेवला होता.

बॉम्बे टॉकीजचे संस्थापक हिमांशू राय यांच्या पत्नी आणि अभिनेत्री देविकाराणी यांच्या प्रोत्साहनानेच १९४३ मध्ये युसूफ खान याचा हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. हिंदी लेखक भगवतीचरण वर्मा यांनी युसूफ खान याचं दिलीपकुमार असं नामकरण केलं.

'ज्वारा भाटा' या सिनेमाद्वारे दिलीप साहेबांनी आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली. 'जुगनू' हा त्यांचा पहिला हिट सिनेमा होता. ज्वार भाटा या सिनेमासाठी त्यांना १२५० रुपये मानधन मिळाले होते. त्यावेळी ते केवळ १९ वर्षांचे होते.

अशी मिळाली ‘ट्रॅजेडी किंग’ची ओळख

१९४९ मध्ये 'अंदाज' या सिनेमात दिलीप कुमार यांनी पहिल्यांदा राज कपूर यांच्याबरोबर काम केलं होतं. दीदार (१९५१) आणि देवदास (१९५५) या सिनेमांमध्ये गंभीर स्वरुपाच्या भूमिका साकारल्यानंतर दिलीप साहेब यांना ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

क्रांती (१९८१), विधाता (१९८२), दुनिया (१९८४), कर्मा (१९८६), इज्जतदार (१९९०) आणि सौदागर (१९९१) हे दिलीप साहेबांचे निवडक गाजलेले सिनेमे आहेत.


अधुरी प्रेमकहाणी

मधुबाला आणि दिलीप कुमार यांच्या प्रेमाबद्दल सर्वांनाच ठाऊक आहे. दिलीप कुमार यांचे मधुबालावर जीवापाड प्रेम होते. कामिनी कौशल यांच्यानंतर दिलीप साहेबांनी मधुबालाला आपल्या जोडिदाराच्या रुपात बघितले होते. मधुबालाबरोबरसुद्धा दिलीप साहेबांनी एकुण चार सिनेमांमध्ये एकत्र काम केलं.

तराना, संगदिल, अमर आणि मुगल-ए-आजम या सिनेमांमध्ये दिलीप कुमार-मधुबाला ही जोडी झळकली होती. दोघांचे प्रेम बहरत असताना मधुबालाच्या वडिलांनी त्यांच्यात आडकाठी निर्माण केली.

मधुबालाचे वडील अताउल्लाह खान यांना या दोघांचे नाते कबूल नव्हते. त्यामुळेच त्यांनी मधुबालाला दिलीप कुमार यांच्याबरोबर नया दौर या सिनेमात काम करू दिलं नाही. दिलीप साहेबांनी १९६६ साली आपल्या वयापेक्षा २२ वर्षे लहान असलेल्या सायरा बानोबरोबर लग्न केलं.

गिनीज बुकमध्ये नोंद

सर्वाधिक पुरस्कार आपल्या नावी करणाऱ्या दिलीप साहेबांच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदवलं गेलं आहे. आपल्या जीवनात दिलीप साहेबांनी तब्बल आठ वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्म फेअर पुरस्कार मिळवला होता.



हेही वाचा

महानायक हरपला, दिग्गज अभिनेते दिलीपकुमार यांचं निधन

शगुफ्ता अली गेल्या ४ वर्षांपासून बेरोजगार, चाहत्यांकडे मागितली मदत

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा