एक वादग्रस्त व्यक्तिमत्व...

 Pali Hill
एक वादग्रस्त व्यक्तिमत्व...

मुंबई – ओम पुरी हे नेहमीच वादग्रस्त व्यक्तिमत्व राहिलं. आयुष्यात वाद आणि त्यांची साथ ही नेहमीचीच राहिली. त्यांच्या पश्चात पत्नी नंदिता आणि मुलगा ईशान आहेत.

अनेक सामाजिक मुद्द्यांवर वा विषयांवर त्यांनी घेतलेली भूमिका वादग्रस्त ठरली. वैयक्तिक आयुष्यातही वादांनी त्यांची साथ सोडली नाहीच. पत्नी नंदितानं 2013मध्ये लिहिलेल्या अनलाइकली हीरो – द स्टोरी ऑफ ओम पुरी या आत्मचरित्रात या दोघांतले अत्यंत खासगी आणि उत्कट क्षण उघड करण्यात आले होते. त्यावरून त्यांचा संसारही मोडीत निघाला. ऑक्टोबर 2016मध्ये एका टॉक शोमध्ये त्यांनी लष्करात भरती व्हायला सैनिकांना कुणी सांगतं का, असं विधान केलं. त्यावरही गदारोळ झाला. अखेर पुरींना त्याबद्दल माफी मागितली. पण तीही ओम पुरी शैलीतलीच होती. याबद्दल मला माफ करू नका, मी देशाला विनंती करतो की याबद्दल मला शिक्षा द्या, असं ते म्हणाले होते. राजकीय नेतेही त्यांच्या तावडीतनं सुटले नव्हते. अण्णा हजारेंवरही त्यांनी टीका केली. राजकीय नेते अशिक्षित असतात. अर्ध्यापेक्षा जास्त खासदार अडाणी आहेत असं ते म्हणाले आणि नंतर त्यांनी त्याबद्दलही माफी मागितली.

भारतात राहणं असुरक्षित वाटत असल्याच्या आमिर खान-किरण राव यांच्या भूमिकेवरही ओम पुरींनी हल्ला चढवला होता. गोहत्याबंदीविरोधी मत व्यक्त करताना त्यांनी आपण मांस निर्यात करून डॉलर कमावतो, याची आठवण दिली होती. सैनिकांबाबतच्या विधानातून झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अभिनयालाच रामराम ठोकण्याचा विचार बोलून दाखवला होता. जानेवारीतच तीन महिन्यांसाठी ते कॅनडालाही जाणार होते.

पण अचानक ते या सगळ्याच्या पलीकडेच निघून गेले...

Loading Comments