SHARE

तरुण रॉकिंग गायक म्हणून मराठी संगीतक्षेत्रात ओळखला जाणारा रोहित राऊत आणि जॅझी गायिका जुईली जोगळेकरने पहिल्यांदा एकत्र चित्रपटासाठी पार्श्वगायन केलं आहे. ‘बॉईज २’ या चित्रपटात दोघांचं पहिलं गाणं ऐकायला मिळणार आहे.

गायक-संगीतकार-निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता अशी चौफेर कामगिरी करणाऱ्या अवधूत गुप्तेनं संगीतबद्ध केलेलं रोहित-जुईलीच्या आवाजातील ‘येना शोना येना...’ हे गाणं नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं आहे.


'ओठांवर रूळणारं गाणं'

या गाण्यासंदर्भात रोहित म्हणाला, जुईली आणि मी एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखत आहोत, पण एका चित्रपटात एकत्र एक गाणं गाण्याची संधी आम्हाला पहिल्यांदाच मिळाली. आम्ही काही दिवसांपूर्वी लोकाग्रहास्तव एकत्र कवर साँग गायलो होतो. त्याला चांगला प्रतिसाद आल्यावर आता हे रोमँटिंक गाणं गाण्याची संधी मिळाली. अवधूतदादाने खूप छान संगीतबद्ध केलेलं पटकन ओठांवर रूळणारं हे गाणं आहे.


जुईलीनेही मांडले विचार

जुईलीनेही या गाण्यासंदर्भात आपले विचार मांडले. ती म्हणाली, अवधूतदादा माझा आवडता संगीतकार आहे. माझा आवाज खूप बोल्ड असल्यानं मला रोमँटिक गाणं गाण्याची संधी खूप कमी मिळते, पण अवधूतदादाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला हे रोमँटिक गाणं गाण्याची संधी दिली, याचा मला आनंद आहे.
मध्यंतरी मी आणि रोहितने आमच्या चाहत्यांशी सोशल मीडियावरून लाइव चॅट केलं होतं. त्यावेळी आम्ही एकत्र पार्श्वगायन करावं, अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली होती. ती ‘येना शोना येना...’ या गाण्यामुळे पूर्ण झाली आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या