Advertisement

कंगनासोबत स्मिता कोणाशी घेणार ‘पंगा’?

मराठीसोबतच हिंदीतही आपलं करियर घडवण्यात व्यग्र असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रींपैकी एक आहे स्मिता तांबे. स्मिता आता थेट कंगना रणौतसोबत मिळून कोणाशी तरी ‘पंगा’ घेताना दिसणार आहे.

कंगनासोबत स्मिता कोणाशी घेणार ‘पंगा’?
SHARES

मराठीसोबतच हिंदीतही आपलं करियर घडवण्यात व्यग्र असलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रींपैकी एक आहे स्मिता तांबे. स्मिता आता थेट कंगना रणौतसोबत मिळून कोणाशी तरी ‘पंगा’ घेताना दिसणार आहे.


एकत्र झळकणार

सध्या जगभरातील क्रिकेटशौकिनांना विश्वचषकाचे वेध लागले असले तरी, कबड्डीप्रेमींना मात्र त्यानंतर येणाऱ्या ‘प्रो कबड्डी’ची उत्सुकता लागली आहे. आता स्मिता तांबेदेखील कंगना रणौतसोबत या खेळात रंगल्याची पहायला मिळणार आहे. २००६ मध्ये ‘गँगस्टर’ चित्रपटापासून सुरू झालेला कंगनाचा प्रवास ‘मणिकर्णिका’ चित्रपटापर्यंत, तर स्मिताचा हिंदीतील प्रवास ‘सिंघम रिटर्न’पर्यंत येऊन पोहोचला आहे. आता या दोघी प्रथमच ‘पंगा’ या आगामी हिंदी चित्रपटात एकत्र झळकणार आहेत.


कबड्डीवर आधारित 

‘नील बटा सन्नाटा’ फेम दिग्दर्शिका अश्विनी अय्यर-तिवारी यांच्या दिग्दर्शनाखाली बनणाऱा ‘पंगा’ हा चित्रपट कबड्डीवर आधारित असलेला महत्त्वपूर्ण चित्रपट आहे. फाक्स स्टार स्टुडिओजची निर्मिती असलेल्या या चित्रपटात जस्सी गिल, रिचा चढ्ढा, नीना गुप्ता, पंकज त्रिपाठी आदी कलाकारांच्याही भूमिका आहेत. गत वर्षी भोपाळमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ‘पंगा’चं दुसरं शूटिंग शेड्यूल यंदा फेब्रुवारी महिन्यात पूर्ण करण्यात आलं आहे. या चित्रपटाची कथा राष्ट्रीय पातळीवरील कबड्डीपटूवर आधारित आहे. त्यासाठी कंगनानं कबड्डीचे डावपेच शिकण्यासाठी दोन महिन्यांपेक्षा जास्त वेळ दिला आहे.


२४ जानेवारीला प्रदर्शित 

पुढल्या वर्षी २४ जानेवारीला ‘पंगा’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात स्मिता नेमकी कोणत्या भूमिकेत दिसणार याबाबत काहीही समजलेलं नाही. स्मितानं यापूर्वी ‘सिंघम रिटर्न’ आणि ‘रुख’ या हिंदी चित्रपटांद्वारे लक्ष वेधून घेतलं आहे. मराठीत ‘जोगवा’, ’७२ मैल’, ‘देऊळ’, ‘परतू’ या चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या स्मितानं नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सावट’ या मराठी चित्रपटामध्ये डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याची व्यक्तिरेखा साकारली आहे. याशिवाय ‘सेक्रेड गेम्स २’ आणि ‘हवा बदले हसू’ या वेबसिरीजमध्ये दिसलेली स्मिता सध्या ‘माय नेम इज शीला’ या हिंदी वेबसिरीजमुळे लाइमलाईटमध्ये आहे. आता कंगनासोबत ती कोणाशी ‘पंगा’ घेते ते पहायचं आहे.हेही वाचा  -

रुपेरी पडद्यावर झळकणार छत्रपतींचे 'सरसेनापती हंबीरराव'

बिचुकलेंना शिवानी देणार घरकामाचे धडे!
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा