Advertisement

सोनू सूदने अचानक घेतली शरद पवारांची भेट, खरं कारण काय?

बाॅलवूड अभिनेता सोनू सूद याने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची अचानक भेट घेतली.

सोनू सूदने अचानक घेतली शरद पवारांची भेट, खरं कारण काय?
SHARES

बाॅलवूड अभिनेता सोनू सूद याने बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar) यांची अचानक भेट घेतली. शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट झाली. ही सदिच्छा भेट असल्याचं सांगण्यात आलं असलं तरी त्यावरून वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. मुंबई महापालिकेनं आपल्या विरोधातील भूमिका सौम्य करावी, यासाठी सोनू सूद प्रयत्नशील असल्याचं म्हटलं जात आहे. 

जुहूमधील ए. बी. नायर मार्गावरील 'शक्तिसागर' या सोनू सूदच्या मालकीच्या निवासी इमारतीला मुंबई महापालिकेची परवानगी न घेताच निवासी हॉटेलमध्ये रुपांतरित करण्यासाठी इमारतीत अंतर्गत बदल व अतिरिक्त बांधकामे केल्याप्रकरणी महापालिकेने तोडकामाची नोटीस बजावली होती. ही नोटीस आल्यावर सोनूने दिंडोशी दिवाणी न्यायालयात स्थगितीसाठी तातडीचा अर्ज केला होता. मात्र, दिवाणी न्यायालयाने हा अर्ज फेटाळल्याने त्याने उच्च न्यायालयात संरक्षणासाठी तातडीचा अर्ज केला. त्यावर उच्च न्यायालयाने महापालिकेकडून उत्तर मागितलं होतं. त्यानुसार महापालिकेने ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांच्यामार्फत मंगळवारी प्रतिज्ञापत्र दाखल केलं.

हेही वाचा- सोनू सूदच्या अनधिकृत बांधकामप्रकरणी सुनावणी १३ जानेवारीपर्यंत तहकूब

या प्रतिज्ञापत्रात नोटीस बजावून अनेकदा पाडकाम केल्यानंतरही बांधकाम पूर्ववत करण्यात येत असल्याने अपिलकर्ता हा बेकायदा कामे करण्यासाठी सरावलेला दिसत आहे. या इमारतीची मालकी सोनू व त्याची पत्नी सोनालीकडे असल्याचे कागदपत्रेही त्याच्याकडून दाखवण्यात आलेले नाहीत. न्यायालयातील याचिकेच्या माध्यमातून आणि न्यायालयीन प्रक्रियेचा दुरुपयोग करत हे बेकायदा हॉटेल अधिकृत करण्याचा त्याचा प्रयत्न आहे, असा दावा महापालिकेने (bmc) प्रतिज्ञापत्रातून केला आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या सोनू सूदने महापालिकेवर दबाव टाकण्यासाठी शरद पवार यांची भेट घेतल्याचं म्हटलं जात आहे.

लाॅकडाऊनच्या काळात श्रमिकांना त्यांच्या गावी नेऊन पोहचविण्याची सोय केल्यानंतर सोनू सूद प्रकाशझोतात आला होता. यामुळे सर्वच स्तरातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. जे सोनू सूदला जमलं ते राज्य सरकारला का जमू शकत नाही, असा आरोप विरोधकांनी केल्यावर सोनू सूदला भाजप पडद्यामागून मदत करत असल्याचा दावाही करण्यात आला. त्यानंतर सोनूने मातोश्री निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यावर हे प्रकरण थंड झालं होतं.

हेही वाचा- वांद्रे-वर्सोवा सी लिंक द्रुतगती महामार्गाला जोडा, मुख्यमंत्र्यांची सूचना


Read this story in English
संबंधित विषय