विद्या बनणार 'शकुंतला देवी'

'बिग डे...' असं म्हणत विद्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये 'मॅथ जिनीयसची शकुंतला देवींची भूमिका बजावण्यास उत्सुक', असंही विद्यानं लिहिलं आहे. यासोबतच विद्यानं एक फोटो शेअर केला आहे, जो शकुंतला देवींच्या भूमिकेत विद्या दिसणार असल्याचं सांगणारा आहे.

SHARE

प्रवाहापेक्षा वेगळी असलेली कोणतीही भूमिका अत्यंत धाडसानं साकारणारी अभिनेत्री विद्या बालन पुन्हा एकदा एका नव्या रूपात अवतरणार आहे. 'शकुंतला देवी' बनणार असल्याचं विद्यानं स्वत:च घोषित केलं आहे.


विद्वान मुलीची कथा 

'बिग डे...' असं म्हणत विद्यानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये 'मॅथ जिनीयसची शकुंतला देवींची भूमिका बजावण्यास उत्सुक', असंही विद्यानं लिहिलं आहे. यासोबतच विद्यानं एक फोटो शेअर केला आहे, जो शकुंतला देवींच्या भूमिकेत विद्या दिसणार असल्याचं सांगणारा आहे. 'अॅन एक्स्ट्रा आॅर्डीनरी ट्रू स्टोरी आॅफ द ह्युमन कॅाम्प्युटर' अशी ओळ त्याखाली लिहिण्यात आली आहे. गणिततज्ज्ञ असलेल्या एका छोट्या शहरातील विद्वान मुलीची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 


कोण आहेत शकुंतला देवी?

या चित्रपटाचं शीर्षक 'शकुंतला देवी' असंच असेल की, आणखी काही याबाबत खुलासा करण्यात आलेला नाही. याचं दिग्दर्शन अनु मेनन करणार आहेत. विक्रम मल्होत्रांची निर्मिती असलेला हा चित्रपट पुढल्या वर्षी उन्हाळ्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बंगलूरूमध्ये जन्मलेल्या शकुंतला देवी यांची भारतीय लेखिका आणि मेंटल कॅल्यक्युलेटर अशी मूळ ओळख आहे. विशेषत: ह्युमन कॅाम्प्युटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शकुंतला देवी यांच्या नावाची नोंद १९८२ मध्ये गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॅार्डमध्येही करण्यात आलेली आहे. मॅथेमॅटीक्स, पझल्स आणि अॅस्ट्रॅालॅाजी यावर त्यांनी बरंच लेखन केलं आहे.


वर्षअखेरपर्यंत शूटिंगला सुरुवात

अशा महान भारतीय स्त्रीवर चित्रपट तयार होणं ही केवळ स्त्रियांसाठीच नव्हे, तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. राजकारणातील, खेळातील, चित्रपटातील नायक-नायिकांबाबत सर्वांनाच ठाऊक असतं, पण मॅथेमॅटीक्ससारख्या कठीण विषयात प्रावीण्य मिळवणाऱ्या शकुंतला देवींसारख्या विद्वान स्त्रीची कथा अनेकांना प्रेरणादायी ठरेल. या चित्रपटात विद्यासोबत आणखी कोणते कलाकार दिसणार याबाबत सध्या तरी काहीही माहिती मिळालेली नाही. मागील बऱ्याच महिन्यांपासून या चित्रपटाचं लेखन सुरू होतं. दिग्दर्शनासोबत अनु मेनन यांनी नयनिका महतानी यांच्यासोबत या चित्रपटाची कथा लिहिली आहे. इशिका मोइत्रा यांनी या चित्रपटाचं संवादलेखन केलं आहे. या वर्षा अखेरपर्यंत या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करण्याची योजना आखण्यात आली आहे. 


तेलुगू चित्रपटांमध्ये दिसणार

विद्याबाबत सांगायचं तर २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'तुम्हारी सुलू' या चित्रपटासाठी तिनं सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार पटकावला आहे. लवकरच ती 'एनटीआर कथानायकुडू' आणि 'एनटीआर महानायकुडू' या तेलुगू चित्रपटांमध्ये दिसणार आहे. याखेरीज विद्याची भूमिका असलेल्या दिग्दर्शक जगन शक्ती यांच्या 'मिशन मंगल' या हिंदी चित्रपटाचं सध्या पोस्ट प्रॅाडक्शन सुरू आहे. याशिवाय विद्याच्या 'नेरकोंडा पारवै' या तमिळ चित्रपटाचंही पोस्ट प्रॅाडक्शनचं काम सध्या वेगात सुरू आहे.हेही वाचा-

२० वर्षांनी पुन्हा सैफसोबत तब्बू!

गदरचा सीक्वेल येणार
संबंधित विषय
ताज्या बातम्या