भारतातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचं निधन झालंय. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात वयाच्या 86 वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रविवारी रात्री उशिरा मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर दुपारी ट्विटवरुन त्यांची प्रकृती चांगली आहे असं सांगण्यात आलं होतं. टाटा समूहाकडून निधनाची बातमी देण्यात आली.
'माझ्या आरोग्यासंबंधी काही अफवा पसरत असल्याची मला कल्पना असून, मला प्रत्येकाला त्यात काही तथ्य नसल्याचं सांगायचं आहे. माझ्या वयामुळे आणि वैद्यकीय कारणांमुळे सध्या माझी वैद्यकीय तपासणी सुरु आहे.
चिंतेचं कोणतंही कारण नाही. मी एकदम व्यवस्थित असून, लोकांना आणि मीडियाला कोणतीही चुकीची माहिती न पसरवण्याची विनंती करतो असं रतन टाटा यांनी सांगितलं आहे.'
संवेदनशीलपणा कायम जपणारा, सढळ हस्तानं मदत करणारा उद्योगपती अशी रतन टाटांची ओळख होती. आयुष्यभर त्यांनी ती जपली. त्यांचा साधेपणा अनेकांसाठी कुतूहलाचा विषय राहिला.
टाटा आयुष्यभर साधेपणानं जगले. टाटा समूहानं कोणताही उद्योग सुरू करताना आधी देशाचा विचार केला. देशाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांनी अनेक उद्योग सुरू केले. समूहाची ही परंपरा टाटांनी कायम ठेवली.
उच्च नैतिक मूल्य जपण्याचं काम त्यांनी केलं. संकटाच्या काळात त्यांनी देशाला कायम साथ दिली. कोणत्याही अडचणीत ते ठामपणे, निर्धारानं उभे राहिले. त्यामुळे ते देशाचे लाडके झाले.
रतन टाटांचा जन्म 28 डिसेंबर 1937 रोजी झाला. 1991 ते 2012 या कालावधीत ते टाटा समूहाचे चेअरमन राहिले. टाटा समूहाला वेगळ्या उंचीवर नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे.
काळाची पावलं ओळखून त्यांनी टीसीएस कंपनी सुरू केली. टाटा समूहाच्या एकूण महसुलात या कंपनीचा सिंहाचा वाटा आहे. टाटांनी दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय टाटा समूहासाठी फायदेशीर ठरले. समूहाची घोडदौड सुरू ठेवताना टाटांनी कायमच उच्च कोटीची नैतिक मूल्यं जपली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रतन टाटा यांची निधनाची बातमी कळताच त्यांनी अत्यंत दु:ख व्यक्त केलं.
सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ते म्हणाले की, 'रतन टाटा जी यांच्याशी झालेल्या असंख्य संवादांनी माझं मन भरून आलं आहे. मी मुख्यमंत्री असताना त्यांना गुजरातमध्ये वारंवार भेटत आलो आहे. आम्ही विविध मुद्द्यांवर विचार विनिमय करायचो. मला त्याचा दृष्टीकोन खूप समृद्ध वाटला. मी दिल्लीत आलो तेव्हाही हे संवाद सुरूच होते. अत्यंत वेदना झाल्या.' या शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.