Advertisement

लाॅकडाऊनमध्ये १३३५ कारखाने सुरू करायला परवानगी

सोमवार २० एप्रिलपासून सवलत लागू होताच राज्यातील १३३५ कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे. या कारखान्यांतील २० हजार कामगारांना यामुळे कामावर रूजू होता येणार आहे.

लाॅकडाऊनमध्ये १३३५ कारखाने सुरू करायला परवानगी
SHARES

राज्यातील आॅरेंज आणि ग्रीन झोनमधील क्षेत्रांना काही अटी-शर्थींवर लाॅकडाऊनमधून माफक सवलत देण्यात आली आहे. सोमवार २० एप्रिलपासून ही सवलत लागू होताच राज्यातील १३३५ कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे. या कारखान्यांतील २० हजार कामगारांना यामुळे कामावर रूजू होता येणार आहे.

कोरोनाबाधितांची संख्या अधिक असल्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळांतर्गत (MIDC) येणाऱ्या ठाणे, अंबरनाथ, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि मुरबाड इत्यादी क्षेत्रातील कारखान्यांना मात्र या सवलतीतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांना तसंच कामगारांना या सवलतीचा फायदा मिळू शकणार नाही.

कोरोना व्हायरसचं उच्चाटन करणं हे सरकारचं पहिलं लक्ष्य आहे. त्यामुळे रेड झोनमध्ये येणाऱ्या कुठल्याही कारखान्यांना तसंच आस्थापनांना परवानगी देण्यात येणार नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण क्षेत्रात आॅरेंज, ग्रीन झोनमध्येच काही अटी शर्थींवर माफक स्वरूपात कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात येईल, असं स्पष्टीकरण राज्यचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलं. 

हेही वाचा- मुंबई, पुण्याची लाॅकडाऊनमधील अंशत: सवलत रद्द!- उद्धव ठाकरे

दरम्यान, लाॅकडाऊन अंशत: उठताच नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केल्याने राज्यासाठी लॉकडाऊनमध्ये आणलेली शिथिलता मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे महानगर क्षेत्रासाठी रद्द करण्यात आली आहे. तसं या क्षेत्रात लाॅकडाऊनचं पालन अधिक काटेकोरपणे पाळण्याचे निर्देशही प्रशासनाला दिले आहेत.

लॉकडाऊन संदर्भात राज्य शासनाने १७ एप्रिल रोजी काढलेल्या सर्वसमावेशक अधिसूचनेतील नव्याने शिथिल केलेल्या बाबी रद्द करणारी दुरुस्ती मंगळवार २१ एप्रिल रोजी करण्यात आली. ही दुरूस्ती मुंबई महानगरआणि पुणे महानगर क्षेत्रासाठी लागू असेल. या दुरूस्तीनुसार १७ एप्रिलला सुधारित अधिसूचनेपूर्वीची परिस्थिती मुंबई महानगर आणि पुणे महानगरसाठी लागू असेल. तर उर्वरित राज्यात १७ एप्रिलप्रमाणे शिथिलता राहील.

ई कॉमर्स कंपन्यांना इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची वाहतूक करण्यास दिलेली शिथिलताही रद्द करण्यात आली आहे. त्यांना केवळ अन्न, जीवनावश्यक वस्तू, औषधी, आणि वैद्यकीय उपकरणे यांचीच वाहतूक करता येईल. फरसाण, मिठाईची दुकाने, कन्फेक्शनरी दुकाने हेही मुंबई-पुण्यात पूर्वीच्या आदेशाप्रमाणे बंदच राहतील. मुंबई आणि पुण्यात बांधकामे देखील बंदच राहतील तसंच या भागांतील माहिती तंत्रज्ञान कंपन्यांनी देखील त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून ‘वर्क फ्रॉम होम’ पद्धतीनेच काम करून घ्यायचं आहे.

हेही वाचा- WHO चा इशारा खोटा ठरवायचा असेल तर, असं का म्हणाले अजित पवार ?

राज्यभरात वृत्तपत्रांचे वितरण करणारे विक्रेते हे मास्क, जंतू नाशक हाताला लावून तसंच सामाजिक अंतर ठेऊन वृत्तपत्रे घरोघर देऊ शकतील. मात्र मुंबई आणि पुणे पालिका क्षेत्रात तसंच कंटेनमेंट क्षेत्रात वितरण करण्यावर प्रतिबंध राहील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा