मुंबईच्या विलेपार्ले येथील कूपर रूग्णालयात उंदरांनी उच्छाद मांडला आहे. हॉस्पिटलमध्ये अॅडमीट असलेल्या रुग्णांनाही कुरतडल्याच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. या तक्रारीनंतर आता हॉस्पिटल प्रशासन आणि मुंबई महानगरपालिका खडबडून जागी झाली आहे.
रुग्णालय प्रशासनाने के वेस्ट वॉर्डच्या अधिकाऱ्यांमार्फत रुग्णांच्या खोल्यांमध्ये सापळे बसवले आहेत. एकाच दिवसात 15हून अधिक उंदीर या सापळ्यात अडकले आहेत, ज्यामुळे रुग्णालयातील खोल्या उंदरांसाठी आहेत की रुग्णांसाठी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कूपर हॉस्पिटलमधील महिला वॉर्डमधील रुग्णांच्या बेडवर उंदीर मुक्तपणे फिरत असल्याचे आढळून आले होते. यामुळे कूपर हॉस्पिटलमधील स्वच्छता आणि रुग्णांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे. या प्रकरणाची दखल घेत, बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त विपिन शर्मा यांनी के/वेस्ट वॉर्डच्या कीटक नियंत्रण अधिकाऱ्यांना दररोज कूपर हॉस्पिटलला भेट देऊन आवश्यक उपाययोजनांच्या अंमलबजावणीची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
कीटकनाशक अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांनुसार, संपूर्ण रुग्णालय परिसराची तपासणी करण्यात आली आहे. तसेच, उंदीर सांडपाण्याच्या पाईपमध्ये जाऊ नयेत यासाठी जाळी बसवण्यात येत आहेत. उंदीर पकडण्यासाठी महिला वॉर्डमध्ये पिंजरे आणि सापळे बसवण्यात आले आहेत. रविवारी महिला वॉर्डमध्ये ठेवण्यात आलेल्या या पिंजऱ्यात एका दिवसात 15हून अधिक उंदीर पकडले गेले.
उंदरांची समस्या का उद्भवली आणि त्यावर दीर्घकालीन उपाय काय हे शोधण्यासाठी प्राथमिक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीद्वारे, रुग्णांचे नातेवाईक आणि भेट देणाऱ्या नागरिकांनी उंदीरांची पुनरावृत्ती रोखण्यासाठी नियुक्त केलेल्या जागांवर आणि कचराकुंड्यांव्यतिरिक्त इतरत्र कचरा टाकू नये यासाठी देखरेख व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
हेही वाचा