मंगळवारी संध्याकाळी झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे मुंबईत (mumbai) पुरता गोंधळ उडाला. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले, वाहतूक विस्कळीत झाली आणि अनेकजण जखमी झाल्याचेही पाहायला मिळाले.
पवई येथे रात्री 8:42 वाजताच्या सुमारास, जल वायु विहार, सेक्टर सी, एसएम शेट्टी शाळेजवळ, एक झाड कोसळले आणि त्यात दोन जण जखमी झाले.
या घटनेत शोभा तोरणे नावाच्या 40 वर्षीय महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मुंबई अग्निशमन दलाने दिली. या खोल जखम झाली असून, तिची प्रकृती गंभीर आहे. 45 वर्षीय प्रशांत तोरणे यालाही दुखापत झाली असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
मंगळवारी संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी (andheri), दहिसर, बोरिवली, वांद्रे, कुर्ला, साकी नाका आणि पवई, डीएन नगर आणि चकाला यासह अनेक परिसरात पूर आला आणि पाणी साचले.
उपनगराच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा अंधेरी सबवे पुरामुळे बंद करावा लागला, ज्यामुळे गर्दीच्या वेळी वाहतुकीची कोंडी वाढली. या पार्श्वभूमीवर, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबईसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
21 मे रोजी, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) ढगाळ हवामानासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. ढगाळ आकाशामुळे कडक सूर्यप्रकाशापासून काही प्रमाणात आराम मिळण्याची अपेक्षा आहे. तापमान सुमारे 29° सेल्सिअस पर्यंत वाढत आहे, आर्द्रता मध्यम 76% आहे.
तसेच 3 किमी/ताशी वेगाने वारे हलके वाहत आहेत आणि पाऊस पडण्याची 55% शक्यता आहे. हवामान विभागाच्या अहवालांनुसार, किमान तापमान 27° सेल्सिअस ते कमाल 33° सेल्सिअस दरम्यान आहे.
या मान्सूनपूर्व पावसाला (pre monsoon rain) येत्या मान्सून हंगामाची पूर्वसूचना म्हणून पाहिले जाते आणि त्यांचा शहरातील दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ लागला आहे. प्रवाशांना पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करण्यात मोठा विलंब आणि अडचणी येत होत्या, ज्यामुळे पावसाची चांगली तयारी करण्याची तातडीची गरज अधोरेखित होते.
अधिकाऱ्यांनी नागरिकांना हवामानाबाबत अपडेट राहण्याचे आणि सतर्कतेच्या काळात आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा