Advertisement

हा कसला न्याय? २५० घरं, ४ नळ आणि पाणी फक्त १५ मिनिटं !


हा कसला न्याय? २५० घरं, ४ नळ आणि पाणी फक्त १५ मिनिटं !
SHARES

जलयुक्त शिवार योजना, कृत्रिम तळे, पाटबंधारे योजना आणि यामुळे सुजलाम् सुफलाम् झालेला महाराष्ट्र ! अशा सरकारी जाहिराती पाहून तुम्ही म्हणाल की राज्यभरातला दूष्काळ दूर झाला आहे अन् पाणीटंचाई तर अजिबातच नाही. पण जरा थांबा !! कारण देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतलं चित्रच इतकं भयानक आहे की इथं पाण्यासाठी एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. मग गाव-खेड्याची काय अवस्था??




अंधारामुळे झाला अपघात

विक्रोळी पार्कसाईटमधील डोंगराळ वस्तीमध्ये राहणारे ३२ वर्षीय सुनील देठे मंगळवारी रात्री ११.३० वाजेदरम्यान महापालिकेच्या नळाचं पाणी भरण्यासाठी गेले. इथं फक्त १५ मिनिटं पाणी येत असल्याने घाईघाईत कॅन घेऊन जात असताना अंधारामुळे एका ठिकाणी धडपडून पडले. या दुर्दैवी घटनेत त्यांच्या डोक्याला जबर मार बसला. तेथील रहिवाशांनी त्यांना तातडीने घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात नेलं. पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला. सुनील यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुले असल्याने या कुटुंबावर फक्त आणि फक्त पालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधीच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.



सामाजिक संस्थांचा मनमानी कारभार

गेल्या काही वर्षात विक्रोळी पार्कसाईटच्या डोंगराळ भागात पाणी पुरवण्यासाठी स्थानिक सामाजिक संस्थांना पाण्याच्या टाक्या देण्यात आल्या होत्या. मात्र या संस्थांनी मनमानी करून हवं त्या वेळेत, हवं तसं पाणी सोडण्याचे प्रकार सुरू केले. महापालिकेकडील टाक्यांचीही अशीच परिस्थिती आहे.

रात्री ११ नंतर, कधी सकाळी तर कधी मध्यरात्री ३.३० वाजता महापालिका केवळ १५ मिनिटांसाठी पाणी सोडते. यामुळे भर रात्री किंवा पहाटे अंधारात पाणी भरण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडते. यातून रहिवाशांमध्ये भांडणे तर होतातच, पण असे अपघातही होतात.



रस्त्यांवरील दिवे बंद  

इथले रस्ते अतिशय खराब असून रस्त्यांवरील दिवे बंद असल्याने रहिवाशांना काळोखातून वाट काढत चालावं लागतं. त्यातून असे अपघात वारंवार घडतात. दुपारच्या सुमारास पाणी हवं असल्यास इतर भागातून पाणी भरून वर घेऊन जावं लागतं. लहान मुले, महिला आणि तरुणांचा बराच वेळ या विभागात फक्त पाण्याच्या शोधासाठी खर्ची पडतो. महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनधी यांच्याकडे वारंवार तक्रार करून देखील ते कोणतीही उपाय योजना करत नसल्यानेच पालिकेच्या या गलथान कारभाराचा सुनील हा बळी ठरल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.

या विभागात पाण्याचा तुटवडा असून नव्या टाकीचं काम जानेवारी महिन्यात पूर्ण होईल, त्यानंतर या ठिकाणचा पाणीपुरवठा थोडा लवकर आणि तासभर करण्यात येईल, अशी माहिती पालिकेच्या एन विभागाचे जलअभियंता राजन प्रभू यांनी दिली.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा