Advertisement

राज्यात ब्रिटनहून आलेले ४३ प्रवासी कोरोनाबाधित


राज्यात ब्रिटनहून आलेले ४३ प्रवासी कोरोनाबाधित
SHARES

राज्यात ब्रिटनहून आलेले ४३ प्रवासी कोरोनाबाधित आढळले आहेत. यांच्यातील ३२ जणांचे जनुकीय नमुने पुणे येथील राष्ट्रीय विज्ञान विषाणू संस्था (एनआयव्ही) येथे पाठविले आहेत. यात सर्वाधिक म्हणजे १५ प्रवासी मुंबईत आढळले आहेत. ब्रिटनहून राज्यात आलेल्या ३९०० प्रवाशांचा शोध घेतला आहे. यातील २५१६ प्रवाशांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या असून यात ४३ जण बाधित झाल्याचे आढळले.

यात मुंबई (१५), ठाणे (७), पुणे (६), नागपूर (६), नाशिक, औरंगाबाद आणि बुलढाणा येथे प्रत्येकी २, तर नांदेड, रायगड आणि वाशिममध्ये प्रत्येकी १ रुग्णाची नोंद आहे. राज्य सरकारच्या सूचनेनुसार त्यांना करोनाच्या संकरित विषाणूची लागण झाली आहे का याची तपासणी करण्यासाठी जनुकीय नमुने एनआयव्ही येथे पाठविण्यात येत आहे.

मंगळवापर्यंत ३२ जणांचे नमुने पाठविले असून अन्य ११ जणांचे नमुने पाठविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ब्रिटनहून आलेल्या प्रवाशांपैकी २५१६ जणांनी २८ दिवसांचा कालावधी पूर्ण केला आहे. ब्रिटनहून आलेल्या रुग्णांसाठी सेव्हन हिल्समध्ये स्वतंत्र मजल्यावर उपचार सुविधा केल्या आहेत. आत्तापर्यंत १२ प्रवासी रुग्णालयात दाखल असून यातील एकाच रुग्णाला लक्षणे आढळलेली आहेत.

युरोप आणि मध्य आशियातून आलेल्या कोरोनाबाधितांना ठेवण्यासाठी ४० खाटांची स्वतंत्र व्यवस्था जीटी रुग्णालयात केली आहे. येथे अन्य कोरोनाबाधित रुग्णांना ठेवले जाणार नाही. आत्तापर्यंत ८ रुग्ण दाखल आहेत. जनुकीय अहवालात संकरित विषाणू न आढळल्यास यांना सेंट जॉर्जमध्ये पाठविण्यात येईल.

मंगळवारी देशभरात ६ कोरोनाबाधितांमध्ये कोरोनाच्या संकरित विषाणूची बाधा झाल्याचे निदान झाले. यात एक अहवाल पुण्याच्या एनआयव्हीमधील होता. राज्यातील अहवाल याच प्रयोगशाळेत पाठविल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाल्या, परंतु हा अहवाल राज्यातील नसून चेन्नईचा असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

राज्यात मंगळवारी ३०१८ कोरोनाबाधितांचे निदान झाले असून ६८ मृतांची नोंद झाली आहे. राज्यातील सध्याचा मृत्यूदर २.५६ टक्के आहे. मंगळवारी ५५७२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ५४, ५३७ रुग्ण सक्रिय आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४ टक्के नोंदले आहे. सध्या राज्यात २ लाख ८९ हजार रुग्ण गृहविलगीकरण आणि ३२०४ रुग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

ब्रिटनहून आलेल्यांपैकी बाधित प्रवाशांच्या संपर्कात आलेल्यांचाही शोध घेतला जात आहे. मंगळवापर्यंत १६९ सहवासितांचा शोध घेतला असून यातील १३५ जणांच्या चाचण्या केल्या गेल्या. यातून सात जण बाधित असल्याचे आढळले आहे.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा