Advertisement

मुंबईकरांना मिळेल हवामानाचा अचूक अंदाज, शहरात लागणार आणखी ४ रडार

मुसळधार पावसाच्या तावडीत सापडणाऱ्या मुंबईकरांना लवकरच पावसाचा अचूक अंदाज कळणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात (MMR) पुढच्या २ वर्षांत आणखी ४ रडार लावण्यात येणार आहेत.

मुंबईकरांना मिळेल हवामानाचा अचूक अंदाज, शहरात लागणार आणखी ४ रडार
SHARES

मुसळधार पावसाच्या तावडीत सापडणाऱ्या मुंबईकरांना लवकरच पावसाचा अचूक अंदाज कळणार आहे. त्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात (MMR) पुढच्या २ वर्षांत आणखी ४ रडार लावण्यात येणार आहेत. सोबतच जून महिन्याच्या अखेरपर्यंत ६० ठिकाणी स्वयंचलीत पर्जन्यमापक यंत्र देखील बसवण्यात येणार असल्याची माहिती प्रादेशिक हवामान केंद्र, पश्चिम विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली. 

हवामानाचा अचूक अंदाज

सद्यस्थितीत चक्रीवादळ तसंच जोरदार पावसाचा अंदाज घेणारं एक रडार कुलाब्यात कार्यरत आहे. त्या व्यतीरिक्त २ रडार मुंबईत आणि प्रत्येकी एक ठाणे तसंच नवी मुंबईत लावण्यात येईल. लावण्यात येणाऱ्या रडारपैकी १ रडार सी बँडचं तर ३ रडार एक्स बँडचे असतील. सी बँडच्या रडारद्वारे २५० ते ३०० किमी पर्यंतच्या गडगडाटी ढगांचा तसंच चक्रीवादळाचा वेध घेता येतो. तर एक्स बँड रडारद्वारे ५० किमी पर्यंतच्या ढगांची अधिक सुस्पष्ट प्रतिमा मिळण्यास मदत होईल.  

कुठे लागणार रडार?

यापैकी १ रडार गोरेगाव इथं बसवण्यात येईल. हे रडार सी बँडचं असेल. दुसरं रडार बसवण्यासाठी घाटकोपरमध्ये जागा निश्चित करण्यात आली असून तिथं एक्स् बँडचं रडार बसवण्यात येईल. सोबतच १ रडार ठाणे आणि नवी मुंबईत बसवण्यात येईल. लवकरच या रडारची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल. त्यामुळे २०२० च्या मान्सूनपर्यंत सध्याच्या डॉप्लर रडारसोबत नवीन रडार देखील कार्यरत होतील, असे हवामान विभागाने स्पष्ट केलं.  

६० पर्जन्यमापक यंत्रे 

सद्यस्थितीत मुंबई महापालिका, हवामान विभाग आणि मध्य व पश्चिम रेल्वेच्या माध्यमातून मुंबईत ८० स्वयंचलित पर्जन्यमापक यंत्रे कार्यरत आहेत. त्यात जून महिन्यापर्यंत हवामान विभागामार्फत ६० यंत्रांची भर घातली जाईल. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे परिसरांतील पावसाची विस्तृत नोंद घेणं शक्य होईल.   

दर १५ मिनिटांनी सूचना

भारतीय हवामान विभागाची वेबसाइट नव्याने तयार करण्यात येत आहे. ही वेबसाइट तयार झाली की मुंबई परिसरातील १४० पर्जन्यमापक यंत्रांच्या नोंदी सध्या वापरात असलेल्या ‘मुंबई वेदर लाइव्ह’ या अ‍ॅपवर दर १५ मिनिटांनी अद्ययावत केल्या जातील. त्यामुळे पावसाळ्यात विस्तृत परिसरातील पावसाच्या नोंदी समजू शकतील. असं हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.



हेही वाचा-

मान्सूनपूर्व पावसाची मुंबईत हजेरी

पालिकेच्या १२ कर्मचाऱ्यांना डेंग्यू आणि मलेरियाची लागण



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा