SHARE

मुंबईत कुणीही उपाशी पोटी झोपत नाही, असं म्हटलं जातं. हे खरं असलं तरी त्यासाठी आलेल्या परिस्थितीशी तोंड देत, जीवतोड मेहनत करण्याचीही तयारी ठेवावी लागते. आपल्या अडीच वर्षांच्या मुलाला कुशीत घेऊन दिवस-रात्र रिक्षा चालविणाऱ्या सईदकडे पाहून तरी हेच म्हणावं लागेल. पण, सईद आपल्या लहानग्याला मांडीवर घेऊन रिक्षा का चालवतोय? असा प्रश्न कुणालाही पडणं स्वाभाविक आहे. त्यामागचं कारण ऐकाल तर तुमच्या डोळ्यातून पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

रिक्षाचालक मोहम्मद सईद (वय 26) त्याची पत्नी, तीन महिन्यांची मुलगी आणि अडीच वर्षांच्या मुलासोबत वर्सोवा येथे राहतो. सारे काही सुरळीत सुरू असताना सईदच्या पत्नीला काही दिवसांपूर्वी अचानक अर्धांगवायूचा झटका आला. यामुळे त्याला आपल्या पत्नीला तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल करावं लागलं. एकाबाजूला उपचारांसाठी दरदिवसाला येणारा एक हजाराहून अधिकचा खर्च, तर दुसऱ्या बाजूला दोन मुलांना सांभाळणार कोण? असा प्रश्न त्याच्यापुढे उभा ठाकला.

अशा स्थितीत त्याच्या शेजारच्यांनी तीन महिन्यांच्या मुलीला सांभाळण्याची तयारी दाखवल्यानं त्याला काही प्रमाणात दिलासा मिळाला खरा. पण अडीच वर्षांच्या मुलाचा प्रश्न तसाच होता. अखेर नाईलाजानं आपल्या मुलाला कुणाच्याही भरवशावर न सोडता त्यानं रिक्षा चालविताना मुलाला सोबत घेण्याचा निर्णय घेतला. गाठीशी पैसे नसल्यामुळं सईद पत्नीच्या उपचारांचा खर्च आणि मुलांना दोन वेळेचं जेवण भरवण्यासाठी सध्या रिक्षा चालवतोय. मुलगा सोबत असल्यामुळं स्वत: लक्ष देऊन त्याला पोटभर जेवू तरी घालता येतं असे सईद म्हणतो.

काही प्रवासी रिक्षातील मुलाला पाहून प्रश्नचिन्ह उपस्थित करतात किंवा रिक्षात बसणं टाळतात. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याला मी काहीही करू शकत नाही. एका हवालदारानं मला मुलाला रिक्षातील पुढच्या सीटवर बसविल्यावरून दंडही केला. मात्र माझी हालाखिची स्थिती सर्वांनाच समजेल असे नाही, अशी व्यथा सईद मांडतो.

सईदची ही व्यथा सोशल मीडियावरून व्हायरल झाल्यावर लाखो लोकांना समजली. चित्रपट दिग्दर्शक विनोद कापडी यांनी सईदचा मोबाइल क्रमांक ट्विट करुन त्याला मदत करण्याचं आवाहन केलं. या आवाहनाला प्रतिसाद देत अनेकांनी त्याला मदतीचा हात देण्याचं आश्वासन दिलंय. या मदतीनं त्याच्या परिस्थितीत सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या