Advertisement

नाल्यात वाहणाऱ्या नवजात अर्भकाला मांजरींनी वाचवलं

नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला कपड्यात गुंडाळून नाल्यात फेकून दिल्याची घटना घडली आहे.

नाल्यात वाहणाऱ्या नवजात अर्भकाला मांजरींनी वाचवलं
SHARES

नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला कपड्यात गुंडाळून नाल्यात फेकून दिल्याची घटना घडली आहे. मुंबईतील घाटकोपर येथील पंतनगर परिसरात ही घटना घडली. हे अर्भक नाल्यात वाहून जात असताना आसपासच्या मांजरींनी पाहिलं. त्यानंतर मांजरींनी ओरडायला सुरुवात केली. परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीनं याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत या अर्भकाची जीव वाचवला.

नाल्यात अर्भक वाहत असल्याचं पाहून आसपासच्या मांजरींच्या ते लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी आरडाओरडा करायला सुरूवात केली. मांजरींचं ओरडणं काहीतरी वेगळं असल्याचं नागरिकांच्या लक्षात आलं. मांजरींना काहीतरी सांगायचं आहे हे आसपासच्या रहिवाशांच्या लक्षात आलं.

ज्या दिशेने मांजरी ओरडत आहेत त्या दिशेला पाहिल्यानंतर त्यांना धक्काच बसला. कारण नाल्यात नुकतंच जन्मलेले अर्भक होतं. ते कपड्यात गुंडाळलेलं होतं. त्यामुळं ते पाण्यावर तरंगत होतं. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नागरिकांनी तातडीनं पोलिसांना कळवलं. पोलिसांनी यावेळी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली. नाल्यातील अर्भकाला घेऊन पोलिसांनी राजावाडी रुग्णालय गाठलं. तिथं या नवजात अर्भकावर उपचार सुरू आहेत.

अर्भकाची प्रकृती धोक्याची बाहेर असल्याची माहिती मिळत आहे. त्यानंतर पोलिसांनी या नवजात अर्भकासोबतचा फोटो आपल्या ट्विटर हँडलवरून शेयरही केला. पोलिसांनी अर्भकाचा फोटो ट्विट करत 'एक नवजात अर्भक कपड्यात गुंडाळून नाल्यात फेकले गेले असल्याची माहिती पंतनगर निर्भया पथकाला एका हितचिंतकाकडून मिळाली होती. शेजारच्या मांजरींनी ओरडुन गोंधळ केल्याने ती व्यक्ती सावध झाल्याचे समजले. बाळाला त्वरित राजावाडी रुग्णालयात नेले असून बाळ आता सुरक्षित आहे.', असं लिहिलं आहे.

या नवजात अर्भकाला नाल्यात कोणी सोडलं याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. किंवा या अर्भकाचे आई-वडील कोण आहेत हे देखील अद्याप स्पष्ट झालेले नाही. या संदर्भात पोलीस तपास करत आहेत.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा