Advertisement

महापौरांपाठोपाठ स्थायी समिती अध्यक्षांनाही मिळणार महिंद्रा एक्सयूव्ही


महापौरांपाठोपाठ स्थायी समिती अध्यक्षांनाही मिळणार महिंद्रा एक्सयूव्ही
SHARES

मुंबईच्या महापौरांना महिंद्रा एक्सयूव्ही उपलब्ध करून दिल्यानंतर आता स्थायी समिती अध्यक्षांनाही महिंद्रा एक्सयूव्ही ५०० ही कार दिली जाणार आहे. स्थायी समिती अध्यक्षांच्या दिमतीला असलेलं वाहन जुनं झाल्यामुळे तसेच वारंवार त्यात बिघाड होत असल्यामुळे नवीन वाहन उपलब्ध करून देण्याची मागणी अध्यक्षांकडून होत होती. त्यानुसार महापौरांप्रमाणेच स्थायी समिती अध्यक्षांनाही महिंद्रा एक्सयूव्ही हे नवीन वाहन देण्यात आलं. गणपतीपूर्वीच अध्यक्षांच्या सेवेत ही नवीन कोरी गाडी दाखल झाली आहे.


११ लाखांची एक्सयूव्ही दिमतीला

महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या सेवेत असलेली स्कॉर्पियो ही गाडी वारंवार बंद पडत असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून अध्यक्षांचे तसेच घनकचरा विभागातील (यानगृह) अधिकारी यांच्यात खटके उडत होते. त्यामुळे या जुन्या गाडीच्या बदल्यात विभागाने पर्यायी जुनी स्कॉर्पियो गाडी उपलब्ध करून दिली होती. परंतु तीसुद्धा अधूनमधून बंद पडत होती. दरम्यान, विभागानं नवीन वाहनाच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यानुसार अध्यक्षांसाठी सुमारे ११ लाख रुपये किंमतीची महिंद्रा एक्सयूव्ही ५०० हे वाहन खरेदी करण्यात आलं. हे वाहन गणपतीपूर्वीच अध्यक्षांच्या सेवेत दाखल झालं आहे.


गटनेत्यांनाही मिळणार एक्सयूव्ही

महिंद्रा एक्सयूव्ही ५०० हे वाहन मुंबईचे महापौर यांच्या सेवेत आहे. त्यामुळे आता महापौरांप्रमाणे अध्यक्षांनाही हे वाहन उपलब्ध करून दिलं असून भविष्यात सर्व गटनेते आणि वैधानिक समितीच्या अध्यक्षांनाही अशाचप्रकारची वाहने उपलब्ध करून देण्याचा घनकचरा विभागाचा विचार आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा