आशियातील दुसऱ्या क्रमांकाची झोपडपट्टी असलेल्या मुंबईतील (mumbai) धारावी (dharavi) पुनर्विकास प्रकल्पावरून सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. राज्य सरकार आणि अदानी ग्रुपतर्फे धारावी पुनर्विकास प्रकल्प प्रा. लि. (DRPPL) व धारावी पुनर्विकास (redevelopment) प्रकल्पामार्फत (DRP) हाती घेण्यात आला आहे. सात वर्षांत हा प्रकल्प उभारण्याचे उद्दिष्ट आहे.
त्याचाच भाग म्हणून सुरू असलेले सर्वेक्षण मार्च 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या संपूर्ण प्रकल्पात पुनर्विकसित सहकारी गृहनिर्माण संस्थांसह तिथल्या रहिवाशांवर इमारतींच्या देखभालखर्चाचा अतिरिक्त भार येणार नाही. या गृहनिर्माण संस्थांतील क्षेत्रफळाच्या 10 टक्के भूभाग व्यावसायिक कारणांसाठी राखीव आहे. त्यातून मिळणारा महसूल गृहनिर्माण संस्था देखभालीसाठी वापरण्याची संकल्पना आहे. त्यामुळे या संस्थांच्या सदस्यांना इमारतींचे व्यवस्थापन राखण्यात अडचणी येणार नाही, असा दावा केला जात आहे.
पुनर्विकासानंतर स्थापन गृहनिर्माण संस्थांवर मासिक देखभालीचा मोठा भार पडतो. सर्वसामान्य रहिवाशांना हा खर्च परवडत नसल्याने इमारतींच्या देखभाल दुरुस्तीवर परिणाम होतो. त्यामुळेच, धारावी पुनर्विकास प्रकल्पात त्यावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. ‘हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर स्थापन होणाऱ्या गृहसंस्थांना पहिली 10 वर्षे देखभाल खर्चासाठी कॉपर्स फंड दिला जाणार आहे.
त्यामुळे अतिरिक्त 10 टक्के भूभाग भाडेतत्त्वावर दिल्याने उपलब्ध होणारा निधी संस्थांना आगामी वर्षांसाठी वापरता येऊ शकेल. त्यामुळे रहिवाशांवर कोणताही आर्थिक भार येणार नाही आणि त्या संस्था स्वयंपूर्ण ठरतील’, असा विश्वास ‘डीआरपी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. आर.व्ही. श्रीनिवासन यांनी व्यक्त केला आहे.
प्रकल्पातील निविदा, अटींनुसार अपात्र सदनिकाधारकांना भाडेतत्त्वावरील घरांच्या धोरणानुसार घरांची व्यवस्था उपलब्ध केली जाईल. सर्वेक्षणातून सर्व माहिती, डेटाआधारे पुढील नियोजन केले जाणार आहे. सर्वेक्षणातून धारावीत नेमकी किती लोकसंख्या आहे, हे जाणून घेतले जात आहे. इथल्या लोकसंख्येप्रमाणेच दुकाने, धार्मिक स्थळांप्रमाणेच अन्य वास्तूंची माहिती कळणार आहे.
हेही वाचा