Advertisement

मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरतेय..!

मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबईसह अनेक ठिकाणी दूषित हवेची नोंद करण्यात आली.

मुंबईतील हवेची गुणवत्ता घसरतेय..!
SHARES

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वायू प्रदूषणात कमालीची वाढ झाली. मुंबई शहर, उपनगर, नवी मुंबईसह अनेक ठिकाणी दूषित हवेची नोंद करण्यात आली. तर दुसरीकडे ऐन थंडीत पावसाळी वातावरण असल्यानं मुंबईतील वातावरणात थंडी, वाढलेली आर्द्रता अनुभवायला मिळत आहे. यासारख्या असंख्य कारणामुळे मुंबईच्या हवेचा गुणवत्ता दर्जा खालावला.

सफर ही हवेची गुणवत्ता दर्शवणारी संस्था आहे. ही संस्था मुंबई, पुणे, दिल्ली, अहमदबाद या ४ शहरांच्या हवेची गुणवत्ता दर्शवते. मुंबईच्या एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजेच (एक्यूआय) मध्ये नववर्षाच्या सुरुवातीच्या आठवड्यात वायू प्रदूषण वाढल्याची नोंद करण्यात आली होती.

सफर या संस्थेने दर्शवलेल्या मुंबईच्या एअर क्वालिटी इंडेक्सनुसार काही दिवसांपूर्वी संपूर्ण शहराचा एक्यूआय (AQI) ३०० हून अधिक नोंदवण्यात आला. मुंबईतील कुलाबा, माझगाव, वरळी, वांद्रे, कुर्ला, मालाड, भांडूप, चेंबूर या ठिकाणी हवा वाईट असल्याची नोंद केली आहे. यातील सर्वात प्रदूषित झालेल्या ठिकाणांमध्ये कुलाबा ३३२, मालाड ३३२, बीकेसी ३३६, बोरिवली ३०३ या ठिकाणी सर्वात वाईट हवा नोंदवण्यात आली होती. तर भांडूप ११४, माझगाव १९०, वरळी १२१ या ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या हवेची नोंद करण्यात आली होती.

त्याशिवाय, चेंबूर आणि नवी मुंबईतही वाईट दर्जाच्या हवेची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईतील हवेची गुणवत्ता वाईट राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

प्रदूषण वाढीची कारणं काय?

काही दिवसांपूर्वी मुंबईत येणारे वारे हे पूर्वेकडून येत होते. त्यासोबत ह्युमुडिटी वाढली होती. त्यामुळे प्रदूषणाचे जे काही कण आहेत, ते त्या बाष्पावर बसतात आणि ते जड होतात. हे जड झालेले कण हे जमिनीलगतच राहतात. 

सर्वसाधारण मुंबई किंवा इतर बेटांच्या शहरात तापमान हे sea breeze effect मुळे कंट्रोल होतं. sea breeze effect उशिरानं झालं तर अजून तापमान वाढतं. हे तापमान वाढीची कारणं आहे.

गेले काही दिवस पूर्वेकडून येणारे strong वारे हे समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांना प्रतिकार करत होते. त्यामुळे तापमान कमी होण्यासाठी वेळ लागत होता. यामुळे तापमान रात्रीच्या वेळी १७ ते १८ पर्यंत येण्याऐवजी २३ पर्यंत पोहोचतं. sea breeze  लवकर संपत नसल्यानं प्रदूषण समुद्रात शोषलं जात नाही. त्यामुळे प्रदूषणाची पातळी वाढली.

वायू प्रदूषणाचे परिणाम

वायू प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम हा वृद्ध आणि लहान मुलांवर होतो. तसेच हृदयरोग, श्वसनाचे रोग, कर्करोग यासारखे आजार असणाऱ्यांना वायू प्रदूषणाचा धोका जास्त असतो. त्याशिवाय वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांना खाज, कोरड्या हवामानामुळे त्वचेवर परिणाम होणे अशा तक्रारी उद्भवतात.

त्यामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, दम्यानं त्रस्त असलेल्या रुग्णांनी प्रदूषण वाढल्यानंतर काळजी घेणं गरजेचं आहे. आजारी असलेल्या व्यक्तींनी वेळेवर जेवण करणं, औषधं घेणं, चांगलं आणि प्रथिनेयुक्त आहार घेणं महत्वाचं आहे. आपल्या आहारामध्ये अधिक व्हिटॅमिन सी चा समावेश करणंही गरजेचं आहे.

तसेच प्रदूषणादरम्यान गर्दीची ठिकाणे टाळा. घराबाहेर पडताना मास्क घालायला विसरू नका. सामाजिक अंतर राखून ठेवा आणि वेळोवेळी आपले हात धुवा, असा सल्ला डॉक्टर देत आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा