Advertisement

महाराष्ट्राचा विकास होईपर्यंत ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ सुरुच राहणार- मुख्यमंत्री


महाराष्ट्राचा विकास होईपर्यंत ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ सुरुच राहणार- मुख्यमंत्री
SHARES

राज्य सरकारने सोमवारी वरळी येथील एनएससीआयच्या आवारात ‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ अंतर्गत ‘अॅक्शन फॉर कलेक्टिव्ह ट्रान्सफॉर्मेशन’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात सुमारे सहा हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ‘व्हिजन महाराष्ट्र 2025’ या विषयावर संवाद साधला. महाराष्ट्र हे देशाचे 'ग्रोथ इंजिन' असून या राज्याने नेहमीच तरुणांना मार्ग दाखवण्याचे काम केले असल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. युवकांमधील शौर्य, ज्ञान, भक्ती-शक्तीच्या जोरावर नव महाराष्ट्र घडवताना महाराष्ट्रातील युवा-युवतींच्या संकल्पनांच्या पंखांना बळ देऊन त्या विकासात परावर्तीत करण्याचे काम राज्य शासन करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.

‘ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र'ची सुरुवात करताना एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये विविध महाविद्यालयांच्या अकरा संघांची अंतिम फेरीत निवड झाली होती. या 11 संघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर मान्यवरांच्या समोर आपल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले. या कार्यक्रमात सुमारे सहा लाख युवकांनी सहभाग नोंदवला तर 2 हजार 300 हून अधिक सादरीकरण प्राप्त झाले.

युवकांसाठी ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र हे महत्त्वाचे व्यासपीठ तयार झाले आहे. 'ट्रान्सफॉर्म महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र संघ तयार करण्यात येणार असून यात मंत्रिगटातील मुख्यमंत्री सचिवालयातील संबंधित अधिकारी आदींचा समावेश असेल. येत्या 6 महिन्यात निवडण्यात आलेल्या 11 सादरीकरणांचा अभ्यास करून अंमलबजावणीसाठी आराखडा तयार करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. या स्पर्धेतील विजेत्यांचा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये उद्योगपती रतन टाटा, अभिनेता अक्षयकुमार, मेजर जनरल अनुज माथूर यांनीही उपस्थिती लावली.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा