पुन्हा जिंकायचाय माहीमचा किल्ला!

MAHIM
पुन्हा जिंकायचाय माहीमचा किल्ला!
पुन्हा जिंकायचाय माहीमचा किल्ला!
पुन्हा जिंकायचाय माहीमचा किल्ला!
See all
मुंबई  -  

माहीमचा किल्ला म्हणजे मुंबईचा ऐतिहासिक ठेवा! एकेकाळी हा किल्ला इंग्रज, पाेर्तुगीज आणि मराठा साम्राज्याची शान होती. पण काळाच्या ओघात या किल्ल्याची ओळख केवळ कागदोपत्रीच उरली. मुंबईच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या या किल्ल्याचं जतन आणि संवर्धन होण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. परंतु अतिक्रमण, तसेच सरकारी अनास्थेची झळ बसलेल्या या भग्नावस्थेतील किल्ल्याकडे पाहून कुठल्याही मुंबईकराला नैराश्य येईल. दिवसागणिक आपले अस्तित्व गमावणाऱ्या या किल्ल्याकडे इतरांप्रमाणे हताशपणे पहात बसण्याऐवजी 'दर्गा स्ट्रीट माहीम एएलएम'च्या सदस्यांनी हा किल्ला वाचवण्याची माेहीम हाती घेतली आहे. एवढंच नव्हे, तर हा किल्ला मुंबईच्या पर्यटनाचा महत्त्वाचा भाग व्हावा, यासाठी हे सदस्य सरकार दरबारी खेटा मारत आहेत. अतिक्रमण, गर्दुल्ले आणि बेघरांच्या ताब्यात गेलेला माहीमचा किल्ला या 'एएलएम'च्या सदस्यांना आता पुन्हा जिंकायचा आहे.

'दर्गा स्ट्रीट माहीम एएलएम'चे अध्यक्ष अन्वर खान (69) यांनी सांगितल्यानुसार माहीम किल्ल्याच्या अवतीभोवती गर्दुल्ले, बेघर, भिकारी, गुंड अशा उपद्रवी लोकांचा नेहमीच गराडा असतो. त्यामुळे येथे सामाजिक काम करताना बरीच आव्हानं पेलावी लागतात. माहीमचा किल्ला जेथे उभा आहे, तेथे मिठी नदी समुद्राला येऊन मिळते. त्यामुळे मिठी नदीतला सगळा कचरा किल्ल्याच्या परिसरात जमा होतो. दिवसाला जावळपास 45 टन कचरा येथून काढला जातो. हा कचरा एक दिवस जरी काढला नाही, तरी परिसरात असह्य होणारी दुर्गंधी पसरते.

'दर्गा स्ट्रीट माहीम एएलएम'ने या विभागात बरीच सामाजिक कामे केली आहेत. माहीम जंक्शन सिग्नलला लागून असलेल्या मैदानात या 'एएलएम'ने मुलांना खेळायला बाग बनवली आहे. या बागेला 'नाखुदा मोहम्मद अली गार्डन' असे नाव दिले आहे. त्या व्यतिरिक्त 2008 साली माहीम जंक्शन येथे पादचारी भुयारी मार्ग बनवण्यात आला होता. हा मार्ग पादचाऱ्यांसाठी 2016 मध्ये खुला झाला. पण त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले, असे अन्वर खान यांनी 'मुंबई लाइव्ह'ला सांगितले.

हा किल्ला मुंबईच्या पर्यटनातील महत्त्वाचा हिस्सा बनावा यासाठी 'दर्गा स्ट्रीट माहीम एएलएम'चे सदस्य सरकार दरबारी पायपीट करत आहेत. याकामी माहीम परिसरातील नागरीक देखील सदस्यांना सहकार्य करत आहेत.

असा आहे माहीमच्या किल्ल्याचा इतिहास -
माहीमच्या खाडीच्या तोंडावर इ.स. 1140 मध्ये प्रतापबिंब राजाने किल्ला बांधून तेथे आपली राजधानी वसवली होती. ही राजधानी व्यापार, उद्योगधंदे, शास्त्र, संस्कृती यांचं माहेरघर समजली जात होती.

त्यानंतर हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला. इंग्रज स्थापत्यकार जेरॉल्ड ऑगियर याने जुन्या किल्ल्याच्या जागी सध्या अस्तित्वात असलेला किल्ला बांधला. इ.स 1672 मध्ये पोर्तुगीजांनी माहीमच्या किल्ल्यावर हल्ला केला. पण 100 सैनिक आणि 30 तोफांनी सज्ज असलेला किल्ला त्यांना जिंकता आला नाही. त्यानंतर 14 फेब्रुवारी 1689 मध्ये जंजिर्‍याच्या सिद्दी याकूत खानने अडीच हजार सैनिकांच्या जाेरावर हा किल्ला जिंकला. पुढे काही वर्षांनी हा किल्ला परत इंग्रजांनी जिंकून घेतला. त्यानंतर काही वर्षे हा किल्ला मराठ्यांच्याही ताब्यात होता. परंतु 1684 मध्ये हा किल्ला पुन्हा इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.