SHARE

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह महापालिकेतील सर्व पक्षांचे गटनेते जर्मनीतील स्टुटगार्टला रवाना होणार आहेत. येत्या २५ ते २८ सप्टेंबर या कालावधीत ही सर्व मंडळी स्टुटगार्टला जाणार असून यापूर्वी रशियाचा दौरा रद्द करणाऱ्या महापौरांसह गटनेत्यांनी जर्मनीत जाण्याचा निर्धार केला आहे. विशेष म्हणजे, मागचा दौरा हा पहारेकरी असलेल्या भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी ऐनवेळी माघार घेतल्यामुळे महापौरांनी तो दौरा रद्द केला होता. परंतु यावेळी कोटक हेसुद्धा सर्वांसोबत येत असल्यामुळे महापौरांसह सर्व गटनेत्यांचं जर्मनीला जाणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. मात्र, यासर्वांच्या व्हिसाचं विघ्न कायम आहे.


म्हणून स्वीकारलं जर्मनीचं निमंत्रण

जर्मनी येथे भगिनी शहर संबंधीच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाचं आयोजन २५ ते २८ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. त्यामुळे या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं निमंत्रण जर्मनीच्या स्टुटगार्ट शहराच्या वतीनं मुंबई महापौर, उपमहापौर तसेच सर्व गटनेत्यांना पाठवण्यात आलं आहे. या निमंत्रणाचा स्वीकार करून स्टुटगार्टला जाण्याचा निर्णय मुंबईच्या महापौरांनी घेतला आहे. गेल्या महिन्यातील गटनेत्यांच्या सभेत याला मंजुरी देण्यात आली आहे.


सर्व बडे नेते जाणार

त्यानुसार येत्या २४ सप्टेंबर २०१८ रोजी रात्री महापौर विश्वनाथ महाडेश्वर, उपमहापौर हेमांगी वरळीकर, विरोधी पक्षनेते रवी राजा, सभागृहनेत्या विशाखा राऊत, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, सुधार समितीचे अध्यक्ष दिलीप लांडे, बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबुरकर, शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांच्यासह भाजपाचे गटनेते मनोज कोटक, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव, सपाचे गटनेते रईस शेख आदी मंडळी ही सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्यासाठी जर्मनीला रवाना होणार आहे.


स्टुटगार्डचे महापौरही मुंबईत

यापूर्वी स्टुटगार्ट शहराचे महापौर तसेच त्यांचे सहकारी हे मुंबईतही सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी येऊन गेले होते. या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन शिवाजीपार्कच्या महापौर निवासस्थानी करण्यात आलं होतं. त्यानुसार स्टुटगार्ट शहराने आता मुंबईच्या महापौरांसह गटनेत्यांना सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं आहे. मात्र, यापूर्वी सेंट पीटर्सबर्गचा दौरा केवळ पहारेकऱ्यांच्या भीतीमुळे रद्द करणाऱ्या महापौरांनी स्टुटगार्टला जाण्याची नवीन शक्कल लढवली आहे.


विमानखर्च स्वत:चा

यामध्ये विमानाचा खर्च प्रत्येक गटनेते स्वत:च करणार असून प्रवास खर्च वगळता तिथं राहण्याचा आणि फिरण्याचा खर्च हा तेथील सरकारी यंत्रणा करणार आहे. त्यामुळे आपण स्व:खर्चाने जात आहोत. करदात्यांच्या पैशातून नाही, असं सांगत सर्वांनी जनतेच्या आरोपांमधून आपली सुटका करून घेतली आहे. या दौऱ्यासाठी स्थायी समिती अध्यक्षांनी पुढील पूर्वनियोजित बैठक शुक्रवारी होणार असल्याने त्यापुढील बैठक सोमवारी घेऊन सभेची औपचारिकताही पूर्ण करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.


व्हिसाचं विघ्नं

मात्र, या दौऱ्यावर जाण्यासाठी सर्व गटनेते इच्छित असले तरी त्यांच्यासमोर व्हिसाचं विघ्नं आहे. व्हिसा मिळणाऱ्या गटनेत्यांनाच जर्मनीला जाता येणार आहे. सर्व तिकीट आणि व्हिसाची तयारी सुरू असली तरी अजूनही या दौऱ्याबाबत साशंकता असल्याचंही बोललं जात आहे. रशियाप्रमाणे शेवटच्या क्षणाला हा दौरा रद्द होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.


स्टुटगार्टचं निमंत्रण अाम्हाला मिळालं असलं तरी तेथील अभ्यास दौऱ्यात काय असणार आहे, याची माहिती आम्ही मागवली आहे. ही माहिती प्राप्त झाल्यावर अभ्यास दौऱ्यातून काही शिकायला मिळणार असेल तर वरिष्ठांशी चर्चा करून तिथे जाण्याचा निर्णय घेतला जाईल. परंतु सध्या असा कोणताही निर्णय अाम्ही घेतलेला नाही. जरी भविष्यात स्टुटगार्टला गेलो तरी स्वखर्चाने जाईन.

- मनोज कोटक, भाजपचे गटनेते


हेही वाचा-

नागराज, आर्ची-परशाचा 'सैराट' निर्णय, 'मनचिसे'त घेतला प्रवेश

शिवसेनेला स्वत: ची भूमिकाच नाही- राज ठाकरेसंबंधित विषय
ताज्या बातम्या