Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,97,587
Recovered:
57,53,290
Deaths:
1,19,303
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,577
863
Maharashtra
1,21,859
10,066

अनुयायांनी चैत्यभूमीला येण्याचं टाळावं; आंबेडकरी संघटनांचं आवाहन

अनुयायांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी स्मारक इथं येण्याचं टाळावं, असं आवाहन आंबेडकरी संघटनांच्या वतीने एकमताने करण्यात आलं आहे.

अनुयायांनी चैत्यभूमीला येण्याचं टाळावं; आंबेडकरी संघटनांचं आवाहन
SHARES

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी (रविवार, ६ डिसेंबर २०२०) तमाम अनुयायांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी स्मारक इथं येण्याचं टाळावं, असं आवाहन आंबेडकरी संघटनांच्या वतीने एकमताने करण्यात आलं आहे.

बृहन्मुंबई महापालिकेच्या जी/उत्तर विभाग कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांसमवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलीस उप आयुक्त प्रणय अशोक, महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर, गजानन बेल्लाळे, स्वप्नजा क्षीरसागर यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी म्हणून चंद्रकांत कसबे,  रमेश जाधव, नागसेन कांबळे, भिकाजी कांबळे, रवी गरुड, प्रदीप व प्रतीक कांबळे, सचिन कांबळे आदी उपस्थित होते.

यावेळी महापालिका प्रशासनातर्फे माहिती देताना सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, यंदा कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप कायम असल्याने एकत्र येण्यावर निर्बंध आहेत. हा धोका लक्षात घेऊन अनुयायांना अभिवादन करता यावं म्हणून चैत्यभूमी येथील शासकीय मानवंदनेचे व अभिवादन कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपण करण्यात येणार आहे, त्याची लिंक सार्वजनिक केली जाईल. 

तसंच अशोकस्तंभ, तोरणा प्रवेशद्वार यांची स्वच्छता करुन रंगरंगोटी करण्यात येत आहे. चैत्यभूमी, अशोकस्तंभ, भीमज्योती आदी सर्व ठिकाणी पुष्प-सजावट करण्यात येईल. चैत्यभूमी इथं महत्त्वाच्या व्यक्तींकरिता नियंत्रण कक्ष उभारणी करुन १ अग्निशमन इंजिन, अतिदक्षता रुग्णवाहिका, ४ बोटी आणि जल सुरक्षा रक्षक देखील तैनात केल्या जातील. छत्रपती शिवाजी महाराज पार्क इथं देण्यात येणाऱ्या नागरी सेवा-सुविधा यंदा नसतील. 

महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनाला विविध आंबेडकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी एकमताने संमती दर्शविली. दरवर्षी राज्य शासन, महापालिका, मुंबई पोलीस आणि इतर शासकीय विभाग देखील महापरिनिर्वाण दिनी मोठ्या प्रमाणावर अनुयायांना सेवा-सुविधा देतात. परंतु कोरोना काळात चैत्यभूमी ही आपली सर्वांची जबाबदारी असल्याने सर्व अनुयायी आपापल्या घरुन अभिवादन करतील, अशी ग्वाही या संघटनांनी दिली.

विश्वशांती सामाजिक संस्थेचे अध्यक्ष प्रतीक कांबळे यांनी आवाहन केलं की, सर्व अनुयायांनी ‘राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन’ असा मजकूर लिहून आपले नाव, पत्ता, जिल्हा नमूद करुन चैत्यभूमी स्मारक, दादर (पश्चिम), मुंबई – ४०००२८ येथे पोस्टाने पत्र पाठवून अभिवादन करावं. या उपक्रमास देखील विविध संघटनांनी पाठिंबा दर्शविला.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा