आणिक पांजरापोळ झोपडीधारकांचा पुन्हा उपोषणाचा इशारा

Mumbai
आणिक पांजरापोळ झोपडीधारकांचा पुन्हा उपोषणाचा इशारा
आणिक पांजरापोळ झोपडीधारकांचा पुन्हा उपोषणाचा इशारा
See all
मुंबई  -  

आणिक पांजरापोळ जोडरस्ता प्रकल्पग्रस्त झोपडीधारक पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. 'येत्या दहा दिवसांत सरकारने घरे द्यावीत, अन्यथा एमएमआरडीएच्या मुख्य गेटसमोर सरकारच्या फसव्या धोरणाचा निषेध करू, तसेच बेमुदत आमरण उपोषण करू' असा इशाराच झोपडीधारकांनी दिला आहे. आणिक पांजरापोळ जोडरस्ता पूर्व मुक्त मार्ग (ईस्टर्न फ्री वे) होऊन सहा वर्ष उलटून गेली आहेत. तरीदेखील प्रकल्पातील 2 हजार झोपडीधारकांना अद्याप घरे देण्यात आलेली नाहीत. या झोपडीधारकांनी एप्रिल 2017 रोजी बेमुदत उपोषणाचा मार्ग देखील पत्करला होता. मात्र त्यावेळी भाजपा आमदार आशिष शेलार आणि भाजपाचे मुंबई सरचिटणीस सुनील राणे यांनी उपोषणकर्त्यांना '1 महिन्यामध्ये घरे देऊ' असे आश्वासन दिले होते. एक महिना उलटूनही भाजपा सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण न केल्यामुळे पुन्हा एकदा झोपडीधारक आक्रमक झाले आहेत आणि त्यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे.

विशेष म्हणजे 'प्रथम 904 झोपडीधारकांच्या घरांचे वाटप सुरू करू आणि राहिलेल्या 1 हजार 100 झोपडीधारकांना पुनर्वसनाचे फॉर्म देऊन त्यांचे देखील पुनर्वसन एक महिन्याच्या कालावधीत करू' असे आश्वासन त्यावेळी देण्यात आले होते. मात्र एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी केवळ 525 झोपडीधारकांनाच फॉर्म वाटले. उर्वरित झोपडी धारकांना फॉर्म वाटलेलेच नाहीत. त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांनी याची एमएमआरडीएकडे चौकशी केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या संदर्भात एमएमआरडीएला लेखी पत्राद्वारे कळविण्यात आल्याची माहिती आणिक पांजरापोळ प्रकल्प बाधित झोपडपट्टी संघाचे अध्यक्ष मोतीराम खरात यांनी दिली आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.