आत्महत्या रोखणारा 'अँटी सुसाईड फॅन'

Mulund West, Mumbai  -  

सध्याच्या ताणतणावाच्या जगात आत्महत्येचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. आत्महत्या करण्यासाठी सर्रासपणे घरातील सिलिंग फॅनचा वापर केला जातो. यावर उपाय म्हणून मुंबईतील मुलुंड येथील शरद अशानी यांनी एक अनोखी यंत्रणा बनवली आहे. या यंत्रणेमध्ये आता कोणीही फॅनला गळफास घेऊन आत्महत्या करू शकणार नाही. शरद यांनी 'गोल्ड लाईफ अँटी सुसाईड फॅन रॉड' हा पंखा आणि सिलिंग यांच्या मधील एक लोखंडी रॉड बनवला आहे. ज्यावर अठरा किलो पेक्षा जास्त भार ठेवून पंखा खाली खेचला गेल्यास यातील स्प्रिंग कार्यान्वित होते आणि दोन एकत्र केलेले रॉड वेगळे होतात आणि पंखा सरळ खाली येऊन त्यामधील स्प्रिंगच्या सहाय्याने हवेत तरंगेल. यामुळे गळफास घेणाऱ्याला फास बसणारच नाही.

काही वर्षांपूर्वी म्हणजे 2002 साली नासिफा जोसेफ या मॉडेलने गळफास लावून आत्महत्या केली होती. या बातमीचा परिणाम होऊन शरद यांनी या अनोख्या शोध मोहिमेला सुरुवात केली. शरद अशानी हे मुलुंडच्या वैशाली नगरमध्ये राहणारे ६१ वर्षीय गृहस्थ आहेत. त्यांची सेफ सोल्यूशन नावाची छोटीशी कंपनी भांडुपमध्ये आहे. शरद हे क्रॉम्पटन ग्रीव्ह्ज या कंपनीमधून सहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांनी गेली बारा वर्ष यावर काम करून हा रॉड बनवला आहे. या अनोख्या रॉडसाठी शरद यांच्या नावाने पेटंट देखील मंजूर झाले आहे. या अनोख्या शोधामुळे भविष्यात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवणाऱ्यांचे प्रमाण कमी होईल असा आशावाद बाळगायला काहीच हरकत नाही.

Loading Comments