Advertisement

अंधेरी दुर्घटनेतील जखमी अस्मिता काटकर यांचा मृत्यू


अंधेरी दुर्घटनेतील जखमी अस्मिता काटकर यांचा मृत्यू
SHARES

मंगळवारी सकाळी अंधेरी रेल्वे रूळावर गोखले पुल कोसळला आणि यात सहा जण जखमी झाले होते. सहा जणांपैकी दोनजण गंभीर होते आणि त्यातील एक जखमी अस्मिता काटकर यांची स्थिती अत्यंत नाजूक होती. काटकर यांच्यावर पार्ल्यातील कुपर हाॅस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. गुरूवारी त्या कोमात गेल्या आणि त्यांची प्रकृती आणखी नाजुक झाली.

अखेर शनिवारी संध्याकाळी साडे सहाच्या सुमारास त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज संपली. कुपर हाॅस्पीटलचे वैद्यकीय अधीक्षक राजेश सुखदेवे यांनी काटकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं जाहीर केलं आहे. काटकर यांच्या मृत्यूमुळं अंधेरी दुर्घटनेतील पहिला बळी गेला आहे.


नेहमीचाच रस्ता बनला काळ

३६ वर्षीय काटकर या पती आणि सात वर्षाचा मुलगा सिद्धेश याच्या समवेत अंधेरीत रहायच्या. मंगळवारी काटकर नेहमीप्रमाणं मुलाला अंधेरी पूर्वेकडील परांजपे शाळेत सोडून गोखले पुलावरून घरी परतत होत्या. त्यांच्यासाठी गोखले पुल हा नेहमीचाच रस्ता. पण हाच रस्ता त्यांच्यासाठी काळ बनून आला. या पुलावरून चालत असतानाच पुल कोसळला, काटकर खाली पडल्या नि ढिगाऱ्यात अडकल्या.


शस्त्रक्रियेनंतर कोमात

पोलिस आणि अग्निशमन दलांनी काटकर यांनी ढिगाऱ्यातून बाहेर काढत त्वरीत कुपर हाॅस्पीटलमध्ये दाखल केलं. १६ फुट उंचावरून काटकर खाली पडल्यानं त्यांच्या चेहऱ्याला डाव्या हाताला आणि मेंदुला जबर इजा झाली होती. त्यामुळं त्यांच्यावर त्वरीत शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मेंदुतून मोठा रक्तस्त्राव झाल्यानं शस्त्रक्रियेनंतरही काटकर यांची स्थिती अत्यंत नाजूक होती. त्यामुळं डाॅक्टरांचं त्यांच्या प्रकृतीवर नजर ठेऊन होतं. त्यातच त्या गुरूवारी कोमात केल्या आणि शनिवारी अखेर त्यांचा मृत्यू झाला. काटकर यांच्या मृत्यूनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.



हेही वाचा- 

अंधेरी पूल दुर्घटना : मनोज मेहता यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा