Advertisement

मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई करणं पालिका मार्शलच्या जीवाशी


मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई करणं पालिका मार्शलच्या जीवाशी
SHARES

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं सार्वजनिक ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. मात्र अनेक जण अजूनही मास्क वापरत नाही, तर काहीजण अनुवटीवर मास्क ठेवत प्रवास करतात. त्यामुळं आशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेनं पालिका मार्शलची नेमणूक केली आहे. मात्र गेले काही दिवस पालिका मार्शल यांच्या कारवाई दरम्यान नागरिक व पालिका मार्शल यांच्यात वाद होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशीच एक घटना चेंबूर परिसरात घडली आहे.

मास्कविना प्रवास करणाऱ्या वाहनांवर कारवाई करणाऱ्या महापालिका मार्शल महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करून विनयभंग करणाऱ्याविरोधात चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने हेल्मेटने केलेल्या मारहाणीत ही पालिका मार्शल जखमी झाली आहे. याप्रकरणी मोहसीम वसीम शेख (२७) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पीडित पालिका क्लिन अप मार्शल चेंबूर येथील उर्मशी बाप्पा चौक इथं मास्कविना फिरणाऱ्यांवर कारवाई करत होत्या. यावेळी आरोपी मोहसीम हा मास्कविना फिरताना आढळला. त्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या या मार्शलला मोहसीमने अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच त्यांना हेल्मेटने मारहाण केली.

पोलिसांनी विनयभंग आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पगारे यांनी दिली.

जुहू येथेही मुखपट्टीविना फिरणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या पालिका मार्शलवर हल्ला झाल्याची घटना सोमवारी घडली. नाकाखाली मुखपट्टी परिधान करून फिरणाऱ्यांचे हा मार्शल छायाचित्र काढत होता. त्यामुळे छायाचित्र का काढले, असा जाब विचारून आरोपीने या मार्शलला मारहाण केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून आरोपीला अटक केली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा