Advertisement

पर्यटकांनो लक्ष द्या, माथेरानच्या मालडुंगा पॉईंटवर लँडस्लाईड

पॉईंट पर्यटकांसाठी बंद केला असून कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

पर्यटकांनो लक्ष द्या, माथेरानच्या मालडुंगा पॉईंटवर लँडस्लाईड
SHARES

गेल्‍या काही दिवसांपासून सुरू असलेल्‍या अतिवृष्‍टीमुळे माथेरान घाटरस्‍त्‍यावर दोनदा दरड कोसळण्याच्या घटना घडल्‍या आहेत. शहरातील मालडुंगा पॉइंटवर भूस्खलन झाल्‍याने रस्त्याचा काही भाग खचला. पावसाचा जोर वाढल्‍याने डोंगरावरून लाल मातीसह येणारे पाणी पनवेलच्या दिशेने वाहत आहे. दरम्यान हा पॉईंट पर्यटकांसाठी बंद केला असून कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

माथेरानमध्ये पर्यटकांना पाहण्याकरिता एकूण ३८ पॉईंट्स आहेत. सनसेट पॉईंट आणि मंकी पॉईंटच्या मधोमध मालडुंगा पॉईंट आहे. याठिकाणी जाणाऱ्या पायवाटेतील काही भाग खचला असून मुसळधार पावसामुळे पाणी जाण्याचा मार्ग बंद झाल्याने भूस्खलन झाले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. येथील डोंगर ठिसूळ असून दगडांचे प्रमाण कमी आहे. मुरूम, माती अधिक असल्‍याने अतिवृष्‍टीत ते ढासळतात.

दोन दिवसांपासून पावसाच्या पाण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात माती वाहून जात असून रस्‍ता खचला आहे. जंगलातील काही झाडेही उन्मळून पडली असून वनराईचे नुकसान झाले आहे.

भूस्खलन झाल्याची माहिती मिळताच नगरपालिकेचे अभियंता अभिमन्यू येळवंडे, लेखापाल तथा पालिका अधीक्षक अंकुश इचके, पर्जन्यमापक निरीक्षक अन्सार शेख, स्वच्छता निरीक्षक नरेंद्र सावंत आदींनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली आणि हा पॉईंट पर्यटकांसाठी बंद केला असून कर्मचारी तैनात केले आहेत.

माथेरानमध्ये मंकी पॉईंट येथे दरडी कोसळण्याच्या बातम्या काही वृत्त वाहिन्यांनी प्रसारित केल्या आहेत, त्या बातमीमध्ये काही तथ्य नसून मंकी पॉईंट सुरक्षित असून मालडुंगा पॉईंडवर थोड्या फार प्रमाणात भूस्खलन झाल्‍याचे प्रशासनाकडून स्‍पष्‍ट करण्यात आले आहे.



हेही वाचा

मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये २७ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट

मुंबईत लागू झालेली 10 टक्के पाणीकपात पालिका रद्द करणार?

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा