
एन. एम. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत उभारल्या जाणाऱ्या पुनर्वसन इमारतींमध्ये प्रत्येक घराला एक पार्किंग जागा द्यावी, अशी मागणी येथील रहिवाशांनी केली आहे. या मागणीसाठी रहिवासी राज्य सरकार आणि म्हाडाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. मात्र आता म्हाडाच्या मुंबई मंडळाने ही मागणी फेटाळून लावली आहे.
प्रत्येक घराला स्वतंत्र पार्किंग देणे व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. या निर्णयाची माहिती देणारे पत्र रहिवाशांना पाठवण्यात आले असून त्यामुळे मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरला आहे.
म्हाडाचे मुंबई मंडळ वरळी, एन. एम. जोशी मार्ग आणि नायगाव येथील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करत असून सध्या पुनर्वसन इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या प्रकल्पांतर्गत पार्किंगची सुविधाही देण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) नियमांनुसार प्रत्येक चार घरांमागे एक पार्किंग जागा देणे बंधनकारक आहे. मात्र वाढती पार्किंगची गरज लक्षात घेऊन मुंबई मंडळाने प्रत्येक दोन घरांमागे एक पार्किंग जागा देण्याचा निर्णय घेतला असून हीच पद्धत संपूर्ण प्रकल्पात राबवली जात आहे.
दरम्यान, वरळी बीडीडी चाळींचा पुनर्विकास ‘विशेष प्रकल्प’ म्हणून वर्गीकृत करण्यात आला असून तेथे प्रत्येक घराला एक पार्किंग जागा देण्यात आली आहे. त्यामुळे तेथील रहिवाशांना दिलासा मिळाला आहे.
मात्र एन. एम. जोशी मार्ग आणि नायगाव येथील प्रकल्पांमध्ये अशी सुविधा न दिल्यामुळे येथील रहिवाशांमध्ये नाराजी आहे. याच पार्श्वभूमीवर एन. एम. जोशी मार्गावरील रहिवाशांनी म्हाडाकडे समान पार्किंग सुविधेची लेखी मागणी केली होती, पण ती आता मुंबई मंडळाने नाकारली आहे.
म्हाडाच्या माहितीनुसार, एन. एम. जोशी मार्गावरील पुनर्वसन इमारतींचे तळमजल्याचे बांधकाम पूर्ण झाले असल्याने रचनात्मक बदल करणे शक्य नाही. तसेच आर्थिक मर्यादा आणि मंजूर आराखड्यात बदल करणे आता शक्य नसल्याचेही मंडळाने स्पष्ट केले आहे.
या लेखी नकारामुळे रहिवाशांमधील असंतोष अधिक तीव्र झाला आहे. पार्किंग ही अत्यावश्यक सुविधा असून भविष्यात अपुऱ्या पार्किंगमुळे गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात, अशी भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. मागणी फेटाळली असली तरी रहिवासी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.
सध्याच्या इमारतींमध्ये बदल शक्य नसल्याचे मान्य करतानाच, स्वतंत्र पार्किंग इमारत उभारणे किंवा विक्री घटक (सेल कॉम्पोनेंट) इमारतींमध्ये पार्किंग जागा देणे असे पर्यायी उपाय रहिवाशांनी सुचवले आहेत. हा मुद्दा आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडण्यात येणार असून लवकरच त्यांच्याशी बैठक होण्याची शक्यता आहे, अशी माहिती एन. एम. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नळगे यांनी दिली.
हेही वाचा
