Advertisement

सभागृहापेक्षा भाजपा नगरसेवकांसाठी आयुक्त मोठे

महापालिकेची सर्वसाधारण सभा दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी आयोजित करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात ही सभा ३ वाजून ३० मिनिटांनी सुरु झाली. सभेला सुरुवात झाल्यानंतरही एकही भाजपाचा सदस्य सभागृहात उपस्थित नव्हता. यावेळी भाजपाचे सर्व नगरसेवक गटनेते मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या दालनात बैठकीत होते.

सभागृहापेक्षा भाजपा नगरसेवकांसाठी आयुक्त मोठे
SHARES

 मुंबई महापालिकेची सर्वसाधारण सभा मंगळवारी ४ सप्टेंबर रोजी पूर्वनियोजित असतानाच भाजपाच्या नगरसेवकांनी सभागृहाकडे पाठ फिरवून आयुक्तांच्या दरबारी उपस्थित राहणं पसंत केलं. महापालिकेचं सभागृह हे सर्वोच्च आहे. परंतु सभागृहाच्या कामाकाजाला सुरुवात झाली तरीही भाजपाचे सर्व नगरसेवक आयुक्त अजोय मेहता यांच्यासमवेत बैठकीत बसून राहिले. त्यामुळे सभागृहापेक्षा आयुक्तांची भेट आणि त्यांच्यासोबतची बैठक हीच महत्वाची असल्याचं भाजपाच्या नगरसेवकांनी दाखवून दिलं आहे.


भाजपा नगरसेवक अनुपस्थित

मुंबई महापालिकेच्या इतिहासात प्रथमच भाजपाचे सर्व नगरसेवक सभागृह सुरु झाले तरी सभेला उपस्थित राहिले नव्हते. महापालिकेची सर्वसाधारण सभा दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी आयोजित करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात ही सभा ३ वाजून ३० मिनिटांनी सुरु झाली. सभेला सुरुवात झाल्यानंतरही एकही भाजपाचा सदस्य सभागृहात उपस्थित नव्हता. यावेळी भाजपाचे सर्व नगरसेवक गटनेते मनोज कोटक यांच्या नेतृत्वाखाली महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या दालनात बैठकीत होते. भाजपाच्या नगरसेवकांना आयुक्तांनी दुपारी २ वाजून ३०मिनिटांची वेळ दिली होती. परंतु ही बैठक वेळेवर सुरु न झाल्यामुळे ती लांबली आणि संध्याकाळी चारच्या सुमारास संपली.


सभागृहाला दुय्यम स्थान 

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची वेळ आणि तारीख ही निश्चीत झालेली असताना, सर्वोच्च अशा सभागृहाकडे पाठ फिरवून भाजपाच्या नगरसेवकांनी आयुक्तांसोबत बैठक करण्यास महत्व देत सभागृहाच्या कामकाजाला एकप्रकारे दुय्यम स्थान दिलंय. पिठासीन अधिकारी म्हणून महापौरांच्या अध्यक्षतेखाली सभागृहाचं कामकाज सुरु झाल्यानंतरही ही सभा संपवून आयुक्तांनी सभागृहाचा मान राखला नाही की भाजपाच्या गटनेत्यांनी सभागृहाचा मान राखत बैठक आवरती घेतली नाही. त्यामुळे सत्तेपुढे पहारेकऱ्यांना सभागृहही नगण्य वाटू लागलंय की काय असा सवाल आता सर्वांनाच पडू लागलाय.


समस्या मांडल्याचा दावा

भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी सभागृह सुरु झालेलं असलं तरी जनतेचे प्रश्नच आम्ही आयुक्तांपुढे मांडत होतो, असं सांगितलं. मुंबईमध्ये शौचालय बांधणी आणि दुरुस्ती तथा त्यांच्या सेवा सुविधांच्या मुद्यावरून आयुक्तांशी बैठक करून चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं. मुंबईतील विविध भागातील शौचालय उभारणींमध्ये येणाऱ्या समस्या, प्रशासनाकडून होणारी टाळाटाळ तसेच दुर्लक्ष आदी समस्या भाजपाच्या सर्व नगरसेवकांनी मांडल्या.


द्रुतगती महामार्गावर शौचालये

यावेळी आयुक्तांनी मुंबईत २७ हजार शौचालये बांधण्याचे आणि द्रुतगती महामार्गावर प्रत्येक किलोमीटर अंतरावर एक एक शौचालय उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. याशिवाय ज्या शौचालयांना वीज व पाणी नसेल त्यांना महापालिका पुरवेल. याशिवाय जी शौचालये आहेत, त्यामध्ये एक व दोन मजली बांधकाम करून त्यांची उपलब्धता कशाप्रकारे वाढवता येतील, यासाठीही पुढाकार घेतला जाणार असल्याचं आश्वासन आयुक्तांनी दिल्याचं कोटक यांनी स्पष्ट केलंय.



हेही वाचा - 

आयकराच्या अचूक कारभारासाठी टीडीएसमॅनचं सॉफ्टवेअर

मुंबईकरांचं पाण्याचं टेंशन खल्लास




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा