Advertisement

Electricity Bill: आता EMI ने भरता येईल बेस्टचं वीजबिल

मुंबई शहरात वीज पुरवठा करणारी कंपनी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा (बेस्ट) ने आपल्या ग्राहकांना ३ हप्त्यांमध्ये वीज बिल भरण्याची मुभा दिली आहे.

Electricity Bill: आता EMI ने भरता येईल बेस्टचं वीजबिल
SHARES

मुंबई शहर आणि उपनगरात वाढलेल्या वीज बिलांमुळे वीज ग्राहक चांगलेच वैतागले आहेत. जून महिन्यांत अव्वाच्या सव्वा वीज बिल येऊनही रिडिंगनुसारच वीज बिल आकारल्याचा दावा वीज कंपन्या करत आहेत. अशा स्थितीत मुंबई शहरात वीज पुरवठा करणारी कंपनी बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन उपक्रमा (बेस्ट) ने आपल्या ग्राहकांना ३ हप्त्यांमध्ये वीज बिल भरण्याची मुभा दिली आहे. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ग्राहकांच्या तक्रारींची दखल घेत सुलभ हप्त्यांमध्ये वीज बिल भरण्याची मुभा देण्याचे निर्देश वीज कंपन्यांना दिले होते. 

याबाबत पत्रक काढत बेस्टने स्पष्ट केलं आहे की, १९ मे पासून उपक्रमाच्या औद्योगिक आणि वाणिज्य वीज ग्राहकांना त्यांच्या अंदाजित वापराच्या १० टक्के वापरावर आधारीत वीजदेयक सादर करण्यात आलेली आहेत. औद्यागिक आणि वाणिज्यीक वीज ग्राहकांना स्थिर आकारांवर ३ महिन्यांकरीता अधिस्थगन करण्याची मुभा दिली आहे. टाळेबंदीच्या काळात सर्व ग्राहकांना देण्यात आलेली वीज देयके ही मार्च महिन्याच्या विजेच्या वापराच्या आधारे देण्यात आलेली आहेत. एप्रिल, मे आणि जून या महिन्यामध्ये सर्वसाधारणपणे विजेचा वापर जास्त असतो. टाळेबंदीच्या काळात बहुतेक नागरिक घरीच असल्याने अनेक प्रकरणांमध्ये वीज वापरात वाढ झालेली आहे.

प्रत्यक वीजमापक वाचन घेतल्यानंतर ज्या वीजग्राहकांना जास्त रकमेची अंदाजित देयके सादर करण्यात आली होती. अशा वीज ग्राहकांना त्या रकमेचा व्याजासहित परतावा त्यांच्या अकाऊंटमध्ये देण्यात येईल. ज्या वीज ग्राहकांचे अंदाजित देयक कमी आलं आहे. अशा वीज ग्राहकांना प्रत्यक्ष वीज वापराच्या आधारे देय रक्कम आकारण्यात येईल.

हेही वाचा - Electricity Bill: ‘वर्क फ्राॅम होम’मुळे वीजबिल वाढलं, ऊर्जामंत्र्यांचा अजब दावा

टप्पानिहाय लाभ देण्यासाठी संपूर्ण वापरलेले युनिट महिनावारी विभागले जातील. प्रलंबित प्रदानाबाबतचे आकार आणि थकबाकीवरील व्याज यांची परिगणना केवळ प्रत्यक्ष वीज वापराच्या आधारे करण्यात येईल आणि वसूल करण्यात आलेली अतिरिक्त रक्कम वीज ग्राहकांना त्यांच्या वीज देयकांमध्ये परत करण्यात येईल.

१५ जून २०२० पासून रेड झोन व्यतिरिक्त इतर भागातील वीज ग्राहकांना त्यांच्या प्रत्यक्ष वीज वापरावर आधारीत भागनिहाय देयके देण्याकरीता बेस्ट उपक्रमाने मीटरवाचन करण्यास सुरूवात केली आहे. जेणेकरून प्रत्यक्ष वीजवापरावर आधारीत देयके लवकरात लवकर वीज ग्राहकांना देता येतील. 

धोरणात्मक बाब म्हणून वीज ग्राहकांची गैरसोय टाळण्याकरीता टाळेबंदीच्या कालावधीमध्ये अदत्त प्रदानामुळे विद्युतपुरवठा खंडीत करण्यात आलेला नाही. ज्या वीज ग्राहकांना मार्च ते मे या कालावधीकरीता सरासरी तत्त्वावर दिलेल्या देयकांपेक्षा दुप्पट वा अधिक देय रक्कम आली असेल, अशा वीज ग्राहकांना व्याजासह ३ मासिक सुलभ हप्त्यांमध्ये देयक प्रदान करण्याचा पर्याय देण्यात येईल.

बेस्ट उपक्रमाला असा विश्वास आहे की सदर सवलतीच्या उपायोजनांमुळे वीज ग्राहकांना राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन या अंतर्गत त्यांचे कामकाज सहजतेने सुरू करणे शक्य होईल.

याच पद्धतीने अदानी इलेक्ट्रीसिटीने देखील वीज ग्राहकांना ई-बिल, डिजिटल पेमेंट पर्याय आणि इएमआय पद्धतीने वीज बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

हेही वाचा - Electricity Bill: ‘या’ कारणामुळे तुम्हाला आलंय जास्त लाईट बिल

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा