
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (pratap sarnaik) यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर सोमवारी सकाळपासून बससेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत होऊ लागली आहे.
बेस्टच्या (best) बस पुन्हा रस्त्यावर धावताना दिसत आहेत. सकाळपासून सुरू झालेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बससेवा सुरू झाल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
मात्र सर्व मार्गांवरील सेवा अद्याप पूर्णपणे पूर्ववत झालेली नसून, काही मार्गांवर सकाळच्या सत्रात बससेवा सुरू होऊ शकली नसल्याची माहिती समोर आली आहे.
शुक्रवारपासून सुरू असलेल्या या संपामुळे मुंबईतील (mumbai) सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला होता.
रविवारी रात्री सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य सरकार आणि संपकरी कर्मचारी संघटना यांच्यात बैठक झाली. या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली.
चर्चेदरम्यान सरकारने कर्मचाऱ्यांच्या काही महत्त्वाच्या मागण्या मान्य केल्या. त्यानुसार कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनात 3 हजार रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा 2 हजार रुपयांची वेतनवाढ देण्यात येणार आहे.
याशिवाय चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून प्रलंबित ग्रॅच्युइटीची रक्कम देण्यास सरकारने सहमती दर्शवली आहे.
कर्मचाऱ्यांसाठी कॅन्टीन, स्वच्छतागृह आणि इतर मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याचेही आश्वासन देण्यात आले.
हेही वाचा
