वर्सोवा बीच क्लिन-अपसाठी बिग बींकडून गिफ्ट


SHARE

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ अभियानाचे स्वच्छता दूत असलेले अफरोज शहा यांच्या प्रयत्नांमुळे आज वर्सोवा बीचचा कायापालट झाला आहे. वर्सोवा बीचवर स्वच्छता मोहीम सुरू करून त्यांनी समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या मोहिमेला मुंबईकरांसोबतच सेलिब्रिटींनी देखील पाठिंबा दिला. पूजा भट, अनुष्का शर्मा आणि रणदीप हुडा यांच्यासोबतच अनेक सेलिब्रिटींनी वर्सोवा क्लिन-अप मोहिमेत सहभाग घेतला.

खुद्द बिग बींनी देखील अफरोज शहाला पाठिंबा देत त्याच्या कामाचं कौतुक केलं. फक्त पाठिंबाच नाही, तर स्वत: बिग बींनी वर्सोवा बीचवर येऊन क्लिन-अप ड्राइव्हमध्ये सहभाग घेतला. आता तर बिग बींनी एक पाऊल पुढे जात खोदकामासाठी जेसीबी आणि ट्रॅक्टर दिला आहे.

ट्वीटरवर फोटो शेअर करत बिग बींनी ही माहिती दिली आहे. 'एखाद्या सत्कार्यासाठी हातभार लावण्याचा आनंद वेगळाच असतो. मी आज केलेलं काम हा आयुष्यातील सर्वात समाधानकारक अनुभव होता. वर्सोवा समुद्र किनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी जेसीबी आणि ट्रॅक्टर भेट दिला,' असं ट्वीट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे.

अफरोज शहा यांनीही बिग बींनी गिफ्ट दिलेल्या जेसीबी आणि ट्रॅक्टरचे फोटो शेअर केले आहेत. पर्यावरणविरोधी लढ्यात तुम्ही आशेचा किरण आहात, असं ट्वीट करत अफरोज यांनी बिग बींचे आभार मानले.


संबंधित विषय
ताज्या बातम्या