कंत्राटदार करतायत महापालिकेतून कागदपत्रांची चोरी!

 BMC
कंत्राटदार करतायत महापालिकेतून कागदपत्रांची चोरी!
BMC, Mumbai  -  

महापालिकेतील विकास कामांचे कंत्राट मिळवण्यासाठी कंत्राटदारांकडून अधिकाऱ्यांना हाताशी धरले जात असल्याचा आरोप होत असतो. परंतु, आता अधिकाऱ्यांच्या मदतीनेच यापूर्वीच्या प्रकल्प कामांच्या कंत्राटाची कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न कंत्राटदारांकडून होत असल्याची बाब समोर आली आहे. महापालिकेतील मुख्य लेखापरीक्षकांच्या सांगण्यानुसारच कुलाबा सांडपाणी प्रकल्पाच्या कंत्राटाची कागदपत्रे बाहेरच्या व्यक्तींना दाखवण्यात आली असून या व्यक्तींनी ही कागदपत्रे मोबाईलमध्ये टिपून घेत ही चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचा गौप्यस्फोट भाजपाचे महापालिका गटनेते मनोज कोटक यांनी केला आहे. याप्रकरणी मुख्य लेखापरीक्षकांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.


नक्की झालं काय?

वरळी हबमधील मलनि:सारण प्रकल्प विभागात 25 मे रोजी लेखापरीक्षक विभागाच्या अधिकारी दोन व्यक्तींसह आल्या आणि त्यांनी कुलाबा मलजल शुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाचे ऑडिट करायचे असल्याचे सांगत यासंबंधातील फाईल्स दाखवायला सांगितले. त्यानुसार उपस्थित महिला अधिकाऱ्यांनी ही कागदपत्रांची फाईल सोबतच्या दोन व्यक्तींना दाखवण्यास सांगितले. परंतु, ही कागदपत्रे पाहत असतानाच त्या दोघांनी या कागदपत्रांचे मोबाईलवर फोटो काढले. ही बाब संबंधित विभागाच्या लक्षात येताच त्यांनी याला हरकत घेतली. त्यानंतर हे फोटो मोबाईलवरून डिलिट आले, अशी माहिती भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी दिली.

 

ही दोन माणसे कंत्राटदाराचीच होती आणि भविष्यात जी मलजलशुद्धीकरण प्रकल्पाची कामे येणार आहेत, त्या दृष्टीकोनातून ही कंत्राटदाराने केलेली चाचपणी आहे. मुख्य लेखापरीक्षकांनी कुणाच्या सांगण्यानुसार या दोन व्यक्तींना आपल्या अधिकाऱ्यांसोबत पाठवले? असा सवाल करत मुख्य लेखापरीक्षकांची याप्रकरणी चौकशी करण्यात यावी. 

- मनोज कोटक, गटनेते, भाजप


राणीबागेच्या पिंजऱ्यात अडकणार कंत्राटदार, अधिकारी

राणीबागेतील पिंजऱ्यांचे बांधकाम करण्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदाच महापालिकेने रद्द केल्या आहेत. पाच कंपन्यांनी सहभाग घेतला होता. परंतु, त्यातील एक कंपनी आधीच बाद झालेली असल्यामुळे चारच कंपन्यांचा निविदेत सहभाग होता. त्यात दोन कंपन्या पात्र ठरल्या होत्या. परंतु, या दोन कंपन्यांनी दिलेली कागदपत्रे बोगस असल्यामुळे ती बाद ठरवण्यात आली. या कंत्राटदारांना पुन्हा निविदेत भाग घ्यायची परवानगी देऊ नये आणि या कंपन्यांना पात्र ठरवणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी कोटक यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

Loading Comments