Advertisement

कांदिवलीच्या रुग्णालयातील उंदराला भाजपाने दाखवले महापालिका सभागृह


कांदिवलीच्या रुग्णालयातील उंदराला भाजपाने दाखवले महापालिका सभागृह
SHARES

मुंबई महापालिकेच्या कांदिवली येथील शताब्दी अर्थात डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयातील दोन रुग्णांना उंदराने चावा घेतल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद गुरुवारी महापालिकेच्या सभागृहात उमटले. उंदराने चावा घेतल्याच्या प्रकाराचा निषेध करण्यासाठी सकाळी महापालिका मुख्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसने ठिय्या आंदोलन पुकारल्यानंतर दुपारी भाजपाच्या सदस्यांनी चक्क या शताब्दी रुग्णालयातील उंदिरच पिंजऱ्यात टाकून महापालिकेत आणत सभागृह  दाखवले. त्यामुळे भाजपाने, या प्रकाराचा निषेध करत प्रशासनाच्या कामगिरीचा धिक्कार करत एकप्रकारे सत्ताधारी शिवसेनेलाच टार्गेट केले.

महापालिका रुग्णालयांची आरोग्य सेवा अपुरी

मुंबईतील महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवा सुविधा मोफत पुरवली जात  असली तरी वाढती लोकसंख्या आणि मुंबई बाहेरुन येणाऱ्या रुग्णांमुळे रुग्णालयांची आरोग्य सेवा अपुरी पडत आहे. वाढत्या रुग्णांच्या तुलनेत औषधेच उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना बाहेरुन औषधे आणावी लागत आहेत. डेंग्य आणि मलेरियासह साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत असल्याची आकडेवारीच सादर करत काँग्रेसचे अश्रफ आझमी यांनी महापालिका सभागृहात ६६ (ब) अन्वये चर्चा उपस्थित केली होती.

केईएमसह सर्वच रुग्णालयांमध्ये अस्वच्छता

विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याला पाठिंबा देताना महापालिकेच्या सर्वच रुग्णालयांची हालत खराब असून शीव रुग्णालयात छत तुटलेल्या वॉर्डात रुग्ण उपचार घेत असल्याचे सांगितले. रुग्णांना औषधे मिळत नसून जी औषधे आपण मोफत देत आहोत, त्यांचा साठा किती आहे हे जाहीर फलकावर लावण्यात यावा,अशी मागणी त्यांनी करत एका बाजुला स्वच्छ भारतची संकल्पना राबवली जात आहे. पण केईएमसह अनेक रुग्णालयांमध्ये अस्वच्छताच पसरली असल्याचा आरोप त्यांनी केला.

उंदराचे दिले महापौरांना दर्शन

भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी रुग्णालयांच्या सेवा सुविधांमधील उणीवांची जंत्रीच वाचून दाखवत आता रुग्णांसोबत उंदिर राहू लागले आहे.  ही रुग्णालये आता उंदिराची झालेली असून आमचे सहकारी नगरसेवक कमलेश यादव यांनी याच कांदिवलीच्या रुग्णालयातील उंदिर याठिकाणी आणल्याचे सांगितले. त्याबरोबरच भाजपाच्या नगरसेवकांनी पिंजऱ्यातील उंदिर सभागृहातील उपस्थितांना उंचावून दाखवून महापौरांसह, अतिरिक्त आयुक्त आणि नगरसेवकांना त्या उंदराचे दर्शन दिले. आणि या उंदराच्या प्रतापाकडे दुर्लक्ष करणाऱ्या प्रशासनाच्या धिक्काराचे फलकच सभागृहात फडकावून तीव्र निषेध केला.

महापालिकेची रुग्णालये उंदिरमुक्त करा

रुग्णांचे डोळे आणि पाय उंदिर खातात. हे आम्ही खपवून घेणार नसून ज्या रुग्णालयांमध्ये उंदिर आहेत, ती रुग्णालये उंदिरमुक्त करावे. या उंदरावर त्वरीत कारवाई केली जावी आणि ज्या रुग्णांना उंदराने चावा घेतला आहे, त्यांना महापालिकेच्यावतीने मदत मिळावी,अशी मागणी भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने वस्तुस्थिती लक्षात आणून

शताब्दी रुग्णालयातील उंदिराने घेतलेल्या चावा प्रकरणानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्य महिला अध्यक्षा चित्रा वाघ, मुंबई अध्यक्षा सुरेखा पाटील तसेच नगरसेविका डॉ. सईदा खान यांच्यासह सकाळीच महापालिका आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती लक्षात आणून  दिली आहे. त्यामुळे निश्चितच सर्व रुग्णालयांमध्ये विशेष स्वच्छता राखून अडगळीत ठेवलेले सामान स्वच्छ करावे, रुग्णांना जेवण दिल्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छता राखली जावी, जेणेकरून उंदरांचा वावर तिथे होणार नाही,अशा सूचना केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका गटनेत्या राखी जाधव यांनी स्पष्ट केले.

भाजपाने पोसलेला हा राजकीय उंदिर

भाजपाने सभागृहात आणलेला उंदिर हा राजकीय उंदिर आहे. गेली २० वर्षे याच भाजपाने या उंदराचे पालनपोषण केले आणि तोच उंदिर आज तेच आणून दाखवतात. शिवसेनेसोबत २० वर्षे याच भाजपाने सत्तेचा भोग घेतला आहे, त्यांच्या नगरसेवकांनी आरोग्य समिती अध्यक्षपद उपभोगले आहे. त्यामुळे अडचणी अनंत आहेत, पण यातून मार्ग कसा काढायचा हे सूचवण्याऐवजी भाजपा उंदराला सभागृहात आणून  राजकारण करत असल्याचे सपाचे गटनेते रईस शेख यांनी भाजपा आणि अप्रत्यक्ष शिवसेनेवरही जोरदार टिका केली.

अडचणीच्या काळात महापालिका रुग्णालयाची सेवा महत्वपूर्ण

सभागृहात उंदिर आणून दाखवून एकप्रकारे भाजपने महापालिकेचा अपमान केल्याचे सांगत सभागृहनेते यशवंत जाधव यांनी एलफिन्स्टन दुघर्टनेनंतर चांगली सेवा देणाऱ्या केईएम रुग्णालयांच्या डॉक्टरांचे कौतूक केंद्र आणि राज्य सरकाने केले असल्याचे सांगितले. जेव्हा जेव्हा मुंबईवर संकट आली तेव्हा तेव्हा महापालिकेच्या रुग्णालयांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगून कोणीही त्वेषाचे राजकारण करू नये,अशा शब्दांत  सभागृह नेते भाजपाचा समाचार घेतला.

शताब्दी रुग्णालयात उंदरांचे १६० मार्ग

महापालिकेच्या कोणत्याही रुग्णालयांमध्ये उंदिर, मांजर तसेच कुत्रे नसावेत हे महापालिकेचे मत असून यापुढे अशाप्रकारचे प्राणी दिसणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना रुग्णालयांना देण्यात आल्या असल्याचे अतिरिक्त आयुक्त आय.ए.कुंदन यांनी दिले आहेत. शताब्दी रुग्णालयात फॉल सिलिंगमधून उंदिर येत आहेत. तब्बल १६० ठिकाणी उंदरांचे येण्याचे मार्ग असून हे सर्व मार्ग विद्यमान कंत्राटदार असलेल्या युनिटी कंन्स्ट्रक्शन कंपनीला भरुन देण्यास सांगितले जाणार आहे. तसेच शताब्दी रुग्णालयांमध्ये स्वच्छतेसाठी ज्या ९ एजन्सी आहेत, त्यासर्व रद्द करून एकच एजन्सी नेमली जाईल,असे कुंदन यांनी सांगितले.

डॉक्टर आणि नर्सेसची पदे भरणार

महापालिकेच्या रुग्णालयांमधील ११९ पदे भरली जात आहेत.तसेच व्हेंटीलेटर्स तसेच आयसीयूसाठी अधिक नर्सेसची उपलब्धता लक्षात घेऊन २८२ पदे निर्माण करण्यात येत आहे. त्यातील १५२ पदे भरली जात आहेत. तसेच डॉक्टरांची ११६ पदे निर्माण केली जात असल्याचे कुंदन यांनी सांगितले. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये एमआरआय, सिटी स्कॅन यांचे तपासणी कुठे करावी हे रूग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना कळत नाही. त्यामुळे यासाठी विशिष्ट रंगाचे पट्टे मारले जाणार असून या पट्टयांच्या मार्गावरून चालत गेल्यास जी तपासणी करायची आहे, त्या कक्षाकडे त्यांना पोहोचता येईल,असे कुंदन यांनी सांगितले.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा