उपचारांसाठी आल्या अन् उंदीर चावला, कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातील प्रकार


SHARE

महापालिकेच्या रुग्णालयांत उपचारांसाठी गेलात आणि तिथे तुम्हाला उंदीर चावला तर जोखीम तुमचीच... ही धोक्याची सूचना देण्यामागचं कारण म्हणजे कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या दोन महिलांना उंदीर चावलेत. या गंभीर घटनेमुळे महापालिका रुग्णालयातील अनास्थेकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे. या महिलांवर सध्या डाॅक्टरांच्या देखरेखेखाली उपचार सुरू आहेत. 

बाहेर चकाचक दिसणारं महापालिकेचं रुग्णालय आतमधून किती अस्वच्छ असतं? उंदीर, घुशी, झरंळ यांचा येथे कसा उच्छाद असतो, याचा ठसठशीत पुरावा या घटनेनं दिला आहे. मागील १० दिवसांच्या आतील या दोन घटना आहेत. 

८ ऑक्टोबरला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झालेल्या एका महिलेचा पाय उंदराने कुरतडला. तर, २९ सप्टेंबरला अशीच एक घटना घडली होती.

प्रमिला नेरुरकर नावाची महिला २९ सप्टेंबरला शताब्दी रुग्णालयात दाखल झाली होती. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या महिलेच्या डाव्या डोळ्याला उंदीर चावला. तर, शिलाबेन नावाची महिला रुग्ण ८ ऑक्टोबरला उपचारांसाठी दाखल झाल्यानंतर  त्याच रात्री त्यांच्या डाव्या पायाला उंदीर चावला.
रुग्णाला उंदीर चावल्याची रुग्णालयातील ही पहिलीच घटना नाही. आधीही एका मुलाला उंदीर चावला होता. रुग्णालयाच्या आजूबाजूला झाडी असल्याने तिथे उंदरांचा वावर असतो. शिवाय, दर आठवड्याला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून येथे साफसफाई केली जाते, पिंजरे लावले जातात. तरीही, उंदरांचा येथे सुळसुळाट असतो. 

- डॉ. जयंत चव्हाण, वैद्यकीय अधिक्षक, शताब्दी रुग्णालय, कांदिवली


शिलाबेन यांच्या पायाला फ्रॅक्चर झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांना अनेक वर्षांपासून मधुमेहाचा त्रास आहे. त्यामुळे रक्तस्त्राव होऊनही त्यांना समजले नाही. रात्री ही घटना घडली असली, तरी हा प्रकार सकाळी लक्षात आल्यानं तातडीने त्यांच्या पायावर उपचार करण्यात आल्याचं ही डॉ. चव्हाण यांनी सांगितलं. 

शिवाय, आणखी काही दिवस त्यांना उपचारांसाठी रुग्णालयातच रहावं लागणार असल्याची माहितीही त्यांनी 'मुंबई लाइव्ह'शी बोलताना दिली.

या दोन्ही महिलांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या रुग्णालयात उपचारांसाठी दाखल होणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे.


'केईएम'मध्ये मांजरांचा सुळसुळाट

परळच्या केईएम रुग्णालयातही मोठ्या प्रमाणात मांजरांचा वावर आढळतो. रुग्णालयातील वॉर्डमध्ये या मांजरी फिरताना आढळतात. आपल्या खाटांवर या मांजरी घाण करतात, अशा तक्रारी बऱ्याचदा रुग्ण करतात. अशा प्रकारांमुळे रुग्णांना जंतू संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या) 


संबंधित विषय