Advertisement

'रुग्णांना ड्रॅगन, पपई, किवी फळ द्या', भाजपाची मागणी


'रुग्णांना ड्रॅगन, पपई, किवी फळ द्या', भाजपाची मागणी
SHARES

महापालिकेच्या रुग्णालयांध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी त्यांना सकाळ आणि संध्याकाळच्या आहारात ड्रॅगन फळ, किवी आणि पपई या पौष्टिक फळांचा समावेश करण्याची मागणी भाजपा नगरसेवकांनी केली आहे.


'म्हणून रुग्णांना ही फळे द्या'

महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांबरोबरच उपनगरीय रुग्णालय आणि प्रसुतीगृहांमध्ये दाखल होणाऱ्या आंतररुग्णांना आरोग्यविषयक सेवेबरोबरच आहारही देण्यात येतो. महापालिका रुग्णालयांतील बहुतांशी रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील असल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असलेली पौष्टिक फळे विकत घेणे त्यांना परवडत नाहीत. त्यामुळे महापालिकेच्या तीन प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालयांमध्ये वैद्यकीय उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांना सकाळ आणि संध्याकाळच्या आहारात ड्रॅगन फळ, किवी तसेच पपई सारखी रोगप्रतिकार शक्ती वाढवणारी फळं देण्याची मागणी भाजपाचे नगरसेवक सुषम सावंत यांनी केलं आहे.


रुग्णांना याचा फायदा होईल

महापालिकेच्या रुग्णालये आणि दवाखान्यामध्ये सार्वजनिक वैद्यकीय सहाय्यासाठी आवश्यक असतील अशा इतर उपाययोजना करणे हे महापालिकेचे बंधनकारक कर्तव्य आहे. महापालिकेची तीन प्रमुख आणि उपनगरीय रुग्णालये, दंत रुग्णालय, दवाखाने, आरोग्य केंद्र, प्रसुतीगृह या माध्यमातून संपूर्ण आरोग्य सेवा पुरवते. 

केवळ मुंबईच नाहीतर संपूर्ण राज्य आणि देशाच्या कानाकोपऱ्यातील रुग्ण महापालिकेच्या आरोग्य सेवेचा लाभ घेत असतात. आज मलेरिया, डेंग्यूच्या रुग्णांमधील पांढऱ्या पेशींचं प्रमाण कमी झाल्यानंतर खासगी रुग्णांमध्ये अशाप्रकारचे रुग्ण असल्यास डॉक्टरमंडळी त्यांना ड्रॅगन फळ, किवी तसेच पपईसारखा फलाहार करण्याचा सल्ला देतात. 

त्यामुळे जर अशाप्रकारची फळे महापालिकेने आपल्या रुग्णालयातील गरीब आणि गरजू रुग्णांना दिल्यास त्यांची प्रतिकार शक्ती वाढून त्यांच्यावर पुढील उपचार करणे सोपा जाईल, असं सुषम सावंत यांनी म्हटले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा