पुन्हा एकदा चायनामेड अॅनेस्थेशिया मशीनची खरेदी

  CST
  पुन्हा एकदा चायनामेड अॅनेस्थेशिया मशीनची खरेदी
  मुंबई  -  

  मुंबई महापालिका रुग्णालयांसाठी खरेदी करण्यात आलेल्या 51 भूल यंत्राच्या (अॅनेस्थेशिया वर्कस्टेशन) घोटाळ्यानंतर आता पुन्हा एकदा चायनामेड 'अॅनेस्थेशिया मशीन'ची खरेदी करण्यात येत आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयांसाठी 29 चायनामेड भूल यंत्र खरेदी करण्यात येत आहेत. यापूर्वी खरेदी केलेली 'भूल यंत्रे' इंग्लंड बनावटीची दाखवून काही चायनामेड तर काही भारतीय बनावटीच्या यंत्राचा पुरवठा करण्यात आला होता. त्यामुळे या घोटाळ्याप्रकरणी चौकशीही करण्यात आली. परंतु हा चौकशी पूर्ण होऊनही त्याचा अहवाल दाबून ठेवण्यात आला. आता पुन्हा एकदा महापालिका प्रशासन चायनामेडच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च करून रुग्णांच्या जिवाशी खेळायला निघाली आहे.

  रुग्णांना शस्त्रक्रियेच्या वेळेस भूल देण्याकरता ऑपरेशन थिएटरमध्ये 'हाय अँड अॅनेस्थेशिया वर्कस्टेशन'चा वापर केला जातो. त्यासाठी महापालिका प्रशासन 29 'भूल यंत्रा'ची खरेदी करत आहे. तीन वर्षांचा हमी कालावधी आणि पाच वर्षांची देखभाल या तत्त्वावर 29 मशीन खरेदीसाठी 7 कोटी 81 लाख रुपये खर्च केले जाणार आहे. चायनातील 'शेनझेन मिड्रे बायो मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड' यांच्या गुरगावमधील कारखान्यातून या मशीनचा पुरवठा केला जाणार आहे. लाईफ केअर मेडिकल सिस्टीम्स या कंपनीकडून ही यंत्रे खरेदी केली जाणार आहेत.

  यापूर्वी झालेला घोटाळा -
  महापालिकेने मुंबईतील रुग्णालयात भूल देणाऱ्या 51 मशीनची खरेदी करण्यासाठी 2013 मध्ये 'युनिव्हर्सल ऑरगॅनिक्स' या कंपनीला कंत्राट दिले होते. यासाठी या कंपनीला 6 कोटी 42 लाख रुपयांचे कंत्राट दिले होते. परंतु या कंपनीकडून खरेदी केलेल्या 52 मशीनपैकी 20 मशीन या इंग्लंडमधून आणि उर्वरीत 31 मशीन या चायनामेड परंतु भारतातच तयार करून पुरवठा करण्यात आला होता. यासाठी कंपनीने बनावट पावत्या, चलन, बनावट कस्टम पावत्या अशाप्रकारे बनावट कागदपत्रे तयार केल्याचे उघड केले होते.

  याप्रकरणी तत्कालीन विरोधी पक्षनेते प्रविण छेडा आणि भाजपाचे गटनेते मनोज कोटक यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार मध्यवर्ती खरेदी खात्याचे उपायुक्त राम धस यांनी याची चौकशी पूर्ण करून आपला अहवाल बनवला. परंतु बनावट कागदपत्रे बनवून महापालिकेची दिशाभूल करणाऱ्या या कंपनीची हातचलाखी उघड झाल्यानंतरही या कंपनीविरोधात कोणत्याही प्रकारचा एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे तीन वर्षाचा हमी कालावधी व पाच वर्षांचा देखभाल कालावधी शिल्लक असताना आता आणखी 29 मशीनची खरेदी करण्यात येत असल्यामुळे यापूर्वी खरेदी केलेल्या 51 मशीनचे काय झाले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

  आता कशा चालणार चायनामेड मशीन ?
  मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांसाठी खरेदी करण्यात येणारी यंत्रे ही चायनामेड असल्यामुळे तो प्रस्ताव शिवसेना आणि भाजपाने दप्तरी दाखल केला होता. परंतु आता खरेदी करण्यात येणारी अॅनेस्थेशिया मशीन याही चायनामेड असून या आता शिवसेनेला कशा चालणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.