Advertisement

कोरोना रुग्णांच्या संपर्कातील सगळ्यांच्या तात्काळ चाचण्या होणार

बाधितांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींच्या तात्काळ चाचण्या करण्याच्या सूचना पालिकेनं विभागांना दिल्या आहेत.

कोरोना रुग्णांच्या संपर्कातील सगळ्यांच्या तात्काळ चाचण्या होणार
SHARES

कोरोनाचा संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी लक्षणे नसली तरी बाधितांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींच्या तात्काळ चाचण्या करण्याच्या सूचना पालिकेनं विभागांना दिल्या आहेत.

नव्या नियमानुसार, व्यक्ती बाधित असल्याचे आढळल्यास लगेचच संपर्कातील व्यक्तींच्या तातडीनं चाचण्या कराव्यात. लक्षणं नसली तरीही या चाचण्या केल्या जाव्यात, अशा स्पष्ट सूचना पालिकेनं सर्व विभागांना दिल्या आहेत.

आगामी सणासुदीचा काळ लक्षात घेता चाचण्या, विलगीकरणावर विशेष भर देत संसर्ग प्रसार वाढणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना केंद्र सरकारनं राज्याला केलेल्या आहेत.

व्यक्ती बाधित असल्याचं आढळल्यावर त्याच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचण्या या साधारण चौथ्या किंवा पाचव्या दिवशी केल्या जात होत्या. त्यातही लक्षणं असलेल्यांच्या चाचण्यांवर भर दिला जात असे. परंतु गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्ण वाढत आहेत. तेव्हा बाधितांचे निदान वेळेत करून विलगीकरण करण्याचे धोरण पालिकेनं अवलंबले. यासाठी पालिकनं बाधितांच्या संपर्कातील सर्व व्यक्तींच्या चाचण्या तातडीनं करण्याचा निर्णय घेतला आहे.

आग्रीपाडा इथल्या अनाथाश्रमात बाधित आढळल्यावर तातडीनं शिबीर घेऊन सर्वांच्या चाचण्या केल्यामुळे अन्य बाधितांचंही निदान झालं. कांदिवलीमध्ये देखील एका इमारतीत चार बाधित आढळल्यावर इमारतीत लगेचच चाचण्या केल्यावर आणखी १४ जण बाधित झाल्याचं आढळलं. त्यामुळे ही इमारतही लगेचच सील केली गेली.

परिणामी या व्यक्तींचा वावर रोखला जाऊन संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी मदत झाली. अशा रीतीनं लगेचच चाचण्या झाल्यास बाधितांचं निदान वेळेत होण्यास मदत होईल. म्हणून नियमावलीत हा बदल केलेला आहे, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

रुग्णसंख्या काही अंशी वाढली असली तरी बाधितांचे प्रमाण एक टक्काच आहे. त्यामुळे अजून तरी चिंताजनक स्थिती निर्माण झालेली नाही. परंतु रुग्णसंख्या आटोक्यात राहण्यासाठी नागरिकांच्याही सहकार्याची आवश्यकता आहे. बाधितांच्या संपर्कात आल्यास वेळेत चाचण्या आणि करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन केल्यास संसर्ग प्रसार नक्कीच वाढणार नाही, असं मत काकाणी यांनी व्यक्त केलं.

प्रामुख्यानं गृहनिर्माण संकुलांमध्येच संसर्गाचे प्रमाण काही अंशी वाढले आहे. त्यामुळे शहरातील प्रतिबंधित इमारतींची संख्याही आठवडाभरात २२ वरून ३१ झाली आहे. मुंबईत जुलैच्या शेवटच्या आठवड्यात प्रतिदिन साडेतीनशेहून अधिक रुग्णांची नव्यानं भर पडत होती.

ऑगस्टपासून हे प्रमाण कमी होत सुमारे अडीचशेपर्यंत आले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून पुन्हा किंचित रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. शहरात जोगेश्वरी, अंधेरी, वांद्रे, बोरिवली आणि कांदिवली या भागात रुग्णसंख्या तुलनेनं अधिक आहे.



हेही वाचा

आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी RT-PCR अहवाल बंधनकारक

एका आठवड्यात देशात ३२ टक्के रूग्णवाढ

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा