Advertisement

टॅबखरेदी नववीसाठी, वापरणार दहावीचे विद्यार्थी, महापालिकेचा अजब कारभार


टॅबखरेदी नववीसाठी, वापरणार दहावीचे विद्यार्थी, महापालिकेचा अजब कारभार
SHARES

मुंबई महापालिका शाळांमधील ९ वीच्या विद्यार्थ्यांना अखेर टॅब देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. नवीन टॅब मागील टॅबच्या तुलनेत २ ते अडीच हजार रुपये महाग दराने खरेदी केले असतानाही स्थायी समितीच्या बैठकीत एकाही सदस्याने याबाबत चकार शब्द काढला नाही. विशेष म्हणजे हे महागडे टॅब यावर्षीच्या नववीच्या विद्यार्थ्यांच्या हातीच पडणार नाहीत. तरीही याविरोधात आवाज उठवण्याऐवजी स्थायी समितीतील सर्वच विरोधी सदस्यांनी विरोधाची वज्रमूठ ढिली करत शिवसेनेला आपलं स्वप्न साकार करण्यास उघड मदत केली.


कुणासाठी टॅब खरेदी?

मुंबई महापालिका शाळांमध्ये सन २०१५-१६ व सन २०१६-१७ मध्ये इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात आले होते. त्यापाठोपाठ सन २०१७-१८ मध्ये इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांना मोफत टॅब देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मराठी, ऊर्दू, हिंदी आणि इंग्रजी ४ माध्यमांच्या इयत्ता ९ वीच्या विद्यार्थ्यांना १८ हजार ७८ टॅब विमा व वॉरंटीसह खरेदी करून विद्यार्थी व शिक्षकांना देण्यात येणार आहेत. या टॅबमध्ये ९ वीच्या अभ्यासक्रमाचा समावेश असेल.

तर हेच टॅब सन २०१८-१९ मध्ये इयत्ता १० वीच्या विद्यार्थ्यांना पाठ्यक्रम टाकून देण्यात येतील, असं प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. याबाबतचा प्रस्ताव बुधवारी स्थायी समितीपुढे मंजुरीला आल्यानंतर भाजपा आणि विरोधी पक्षातील एकाही सदस्याने याविरोधात आवाज उठवला नाही.


किती किंमत?

कार्वी मॅनेजमेंट सर्विसेस या कंपनीकडून या टॅबची खरेदी केली जात आहे. प्रत्येक टॅबसाठी १० हजार ३१९ रुपये मोजले जाणार आहेत. त्यामुळे या १८, ०७८ टॅबसाठी १८ कोटी ७० लाख ५२ हजार रुपयांचा खर्च होणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव जानेवारी महिन्यात मंजूर केला जात आहे.


फायदा काय?

समितीने या प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर व पुढील कार्यादेश दिल्यानंतर प्रत्यक्षात शाळांना हे टॅब मिळण्यास कमीत कमी ३ ते ४ महिन्यांचा अवधी जाण्याची शक्यता आहे. परंतु तोपर्यंत मुलांचे शैक्षणिक वर्षच संपत आहे. त्यामुळे नववीच्या मुलांसाठी खरेदी करण्यात येणारे हे टॅब पुढील वर्षी दहावीच्या मुलांना द्यावे लागणार आहे. त्यामुळे नववीच्या मुलांना याचा प्रत्यक्षात कोणताही लाभ मिळणार नाही, असं स्पष्ट असतानाही प्रशासनाला साधा जाबही विचारता आलेला नाही.


  • सन २०१५-१६ : खरेदी केलेले टॅब २२,७९९ (प्रति टॅब दर ६,८५०)
  • सन २०१६-१७ : खरेदी केलेले टॅब २१, ४७१(प्रति टॅब दर ७,३५५)
  • सन २०१७-१८ : खरेदी करण्यात येणारे टॅब १८,०७८ (प्रति टॅब दर १०,३१९)
Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा