Advertisement

मुंबईला आरोग्य सुविधांच्या नुसत्याच घोषणा! कार्यवाही कधी?


मुंबईला आरोग्य सुविधांच्या नुसत्याच घोषणा! कार्यवाही कधी?
SHARES

महापालिका आयुक्त अजोय मेहता मुंबई महापालिकेच्या सन २०१८-१९च्या अर्थसंकल्पावर शेवटचा हात फिरवत आहेत. परंतु, मागील अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी केलेल्या तरतुदींचा पूर्णपणे विनियोग न होता अनेक योजना आणि संकल्पना या कागदावरच राहिल्या आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने 'आपली चिकित्सा' करण्याची गरज निर्माण झाली आहे.


'आपली चिकित्सा' होणार कधी?

सार्वजनिक आरोग्य विभागासाठी चालू अर्थसंकल्पात एकूण ३३११ कोटींची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये महापालिका दवाखान्यातून नि:शुल्क निदान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘आपली चिकित्सा’ या नावाने केंद्र स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती. या केंद्रातून दवाखाने, प्रसुतीगृहे, विशेष रुग्णालये आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मूलभूत आणि अद्ययावत चिकित्सा चाचण्या उपलब्ध करून देण्याचा मानस होता. यामध्ये प्रयोगशाळा चाचण्यांचे नियमित व विशेष अहवाल ऑनलाईन माध्यमातून तसेच छापील नमुन्यात उपलब्ध करून देण्यात येणार होते. परंतु, अद्यापही 'आपली चिकित्सा' केंद्र सुरु करण्यात आलेले नाही.


मल्टिस्पेशालिटी क्लिनिकच्या घोषणेचं झालं काय?

गोरेगाव पूर्व येथे दवाखाना व आरोग्य केंद्रासाठी आरक्षित असलेल्या भूखंडावर मल्टी स्पेशालिटी क्लिनिक बांधण्याचे जाहीर करण्यात आले होते. परंतु, अद्यापही हे क्लिनिक निविदांमध्येच अडकले आहे. तसेच, स्मशानभूमीतील विद्युत दाहिनींचे रुपांतर पीएनजीमध्ये करण्याच्या कामांनाही गती मिळालेली नाही. अद्याप एकही पीएनजीवर आधारीत स्मशानभूमी सुरु झालेली नाही.


रूग्णालयांच्या पुनर्विकासाचा विसर?

मुलुंडमधील एम.टी. अगरवाल रुग्णालय, बोरीवलीतील भगवती रुग्णालय आणि गोवंडीतील शताब्दी अर्थात पंडित मदन मोहन मालवीय रुग्णालय इमारतीच्या पुनर्विकास व पुनर्बांधकामाची एकही वीट रचली गेलेली नसून, अजूनही ही विकास कामे निविदांच्या फेऱ्यात अडकली आहेत. जीटीबी रुग्णालय आणि केईएम रुग्णालय येथे कल्चर व डीएसटी प्रयोगशाळा अद्ययावत बनवण्याच्या कामांनाही तेवढीशी गती लाभलेली नाही.


व्हेंटिलेटर्सची फक्त घोषणा, मिळणार कधी?

महापालिकेच्या सर्व रुग्णालयातील परिचारिकांची (नर्सेस)संख्या टप्प्याटप्प्याने वाढवून चालू आर्थिक वर्षात नवीन ५८२ पदे भरण्यात येणार होती. ही पदे भरुन अतिदक्षता विभागातील रुग्णांना अधिकाधिक चांगली सुविधा देण्याचा मानस असला, तरी आतापर्यंत ही नर्सेसची पदे भरता आलेली नाहीत. पुढील दोन वर्षांत ४०० पेक्षा जास्त व्हेंटिलेटर्स वाढवण्याची घोषणा केली. मात्र, जानेवारी महिन्यामध्ये २३० व्हेंटिलेटर्स खरेदीच्या प्रस्तावाला केवळ मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे प्रत्यक्षात या व्हेंटिलेटर्सचा पुरवठा पुढील वर्षापर्यंत तरी होणार नाही हे दिसून येत आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा