ताडवाडी चाळींचा पुनर्विकास रद्द!

विकासकाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यामुळे त्यांचा पुनर्विकास करार रद्द करण्यात आला आहे. विकासकाला देण्यात आलेले उद्देशाचे पत्र अर्थात 'एलओआय' रद्द करण्यात आले आहे.

SHARE

माझगाव ताडवाडीतील वादग्रस्त बीआयटी चाळींच्या पुनर्विकासासाठी नेमलेल्या विकासकाचा पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. मागील १३ वर्षाँपासून हा पुनर्विकास प्रकल्प रखडलेला असून विकासकाने हा प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यामुळे त्यांचा पुनर्विकास करार रद्द करण्यात आला आहे. विकासकाला देण्यात आलेले उद्देशाचे पत्र अर्थात 'एलओआय' रद्द करण्यात आले आहे. महापालिकेने संबंधित विकासकालाच याबाबतची नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता निदान या चाळींच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.


'अशी' झाली रहिवाशांची परवड

माझगाव ताडवाडी बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाठी विकासकाची नेमणूक झाल्यानंतर मे २००८ मध्ये सुधार समितीच्या माध्यमातून या प्रकल्पाला महापालिकेने मान्यता दिली. इमारत क्रमांक १ व २ व ६ ते १६ या इमारतींच्या पुनर्विकासाचं काम या विकासकाला देण्यात आलं. या चाळींमध्ये एकूण १३६३ भाडेकरु राहत आहेत. मात्र, येथील चाळी पाडून त्यातील १८० कुटुंबांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी संक्रमण शिबिर बांधून करण्यात आलं होतं. त्यानंतर या चाळी धोकादायक झाल्यानं २०१५ मध्ये त्यातील २२० कुटुंबांना माहुल येथील संक्रमण शिबिरांमध्ये हलवण्यात आलं.


नोटीस बजावली

मागील १० वर्षांपासून हा प्रकल्प रखडलेला असून हा प्रकल्प वेळेत पूर्ण न केल्यामुळे मालमत्ता विभागाचे सहायक आयुक्त पराग मसुरकर यांनी त्यांचा एलओआय रद्द केला. मालमत्ता विभागाने याबाबतची नोटीस संबंधित विकासकाला शुक्रवारी बजावली असून महापालिकेच्या भूखंडावर सुरु असलेला पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्यात येईल असंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे.


महापालिकेची जागा अडवली

माझगाव ताडवाडीसह महापालिकेच्या अनेक भूखंडांवर रबरवाला विकासकाने पुनर्विकास प्रकल्प हाती घेतले आहेत. परंतु प्रत्यक्षात यातील एकही प्रकल्प साकारला नसून केवळ हे प्रकल्प त्यांनी अडवून ठेवल्याची बाब महापालिका आयक्त अजोय मेहता यांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी यांचा पुनर्विकास करार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या जागांवर सुरु असलेल्या पुनर्विकास प्रकल्पांना काम थांबवण्याचे निर्देशही या नोटीसच्या माध्यमातून देण्यात आली आहे. तसंच या विकासकाला महापालिकेच्या जागांवरील प्रकल्पांमध्ये पुन्हा स्थान दिलं जाणार नसल्याचंही या नोटीसमध्ये म्हटलं आहे.


चाळींची त्वरीत दुरूस्ती

सभागृहनेते यशवंत जाधव यांनी याबाबत महापालिका आयुक्त अजोय मेहता यांचे अभिनंदन करत आभार मानले आहे. मागील १२- १३ वर्षाँपासून हा प्रकल्प रखडला होता. विकासक जाणीवपूर्वक इमारती धोकादायक ठरवून येथील भाडेकरूंना संक्रमण शिबिरांमध्ये पाठवत होता. त्यामुळे हा पुनर्विकास करार रद्द केल्यामुळे भविष्यात लोकांना संक्रमण शिबिरांमध्ये जाण्यापासून वाचवलं आहे. हा एकपकारे भाडेकरूंचाही विजय असल्याचं सांगत जाधव यांनी पुनर्विकास करार रद्द झाल्यामुळे या चाळींची दुरुस्ती त्वरीत महापालिकेच्यावतीनं हाती घेऊन भाडेकरूंना दिलासा दिला जाईल, असं सांगितलं.हेही वाचा-

माझगाव ताडवाडींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, लवकरच आयओडी मिळणार

..तर, माहुलमधील सर्वांना परत आणा!संबंधित विषय
ताज्या बातम्या