Advertisement

माझगाव ताडवाडींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, लवकरच आयओडी मिळणार


माझगाव ताडवाडींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा, लवकरच आयओडी मिळणार
SHARES

माझगाव ताडवाडीच्या बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाचे घोंगडे अद्यापही भिजतच असून या प्रकल्पाला गती देण्याची मागणी आता रहिवाशांकडून होत आहे. ताडवाडी बीआयटी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पात संक्रमण शिबिरे ही मंजूर आराखड्यानुसार त्याच ठिकाणी बांधण्याची तरतूद आहे. मात्र, याबाबतच्या प्रकल्पाच्या मंजूर आराखड्यानुसार सर्व कागदपत्रांची जर विकासकांनी पुर्तता केली असेल तर पुढील आठ दिवसांमध्ये याबाबतची आयओडी दिली जावी, असे निर्देश महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिले आहे. मालमत्ता विभागाचे सहाय्यक आयुक्त पराग मसुरकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी अशाप्रकारची बैठक झाल्याचे सांगितले. यावेळी आयुक्तांनी,जर सर्व कागदपत्रांची पुर्तता झाली असेल तर त्यांना आयओडी देण्याचे निर्देश संबंधित विभागाला दिले असल्याचे म्हटले आहे.


हा पुनर्विकासाचा प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडलेला

मुंबई महापालिकेच्या मालकीच्या माझगाव ताडवाडी बीआयटी चाळी पुनर्विकासाचा प्रकल्प मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. त्यामुळे या विकास प्रकल्पाला गती देण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे आणि स्थानिक काँग्रेस नगरसेविका सोनम मनोज जामसूतकर यांनी महापालिका आयुक्तांकडे संयुक्त बैठक आयोजित केली होती. यावेळी माझगाव ताडवाडी येथील रहिवाशांना इतरत्र कोठेही स्थलांतरीत न करता तेथेच संक्रमण शिबिर मंजूर आराखड्यानुसार बांधण्याची मागणी सोनम जामसूतकर यांनी महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्याकडे केली. यावेळी या बैठकीला विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे, उपायुक्त (सुधार) चंद्रशेखर चौरे, सहाय्यक आयुक्त(मालमत्ता) पराग मसुरकर यांच्यासह माजी नगरसेवक मनोज जामसूतकर, सुर्यकांत पाटील आदींसह रहिवाशी उपस्थित होते.


'पुर्तता झालेल्या कागदपत्रांना आयओडी द्या' 

यावेळी विकास नियोजन विभागाचे प्रमुख अभियंता संजय दराडे यांनी या प्रकल्पाची फाईल आपल्याकडे असून याबाबत कोणतीही अडचण नसल्याचे सांगितले. त्यामुळे पुढील आठ दिवसांमध्ये कार्यवाही केली जाईल, असे दराडे यांनी सांगितले.त्यावर महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी जर या प्रकल्पाबाबतच्या सर्व कागदपत्रांची पुर्तता झाली असेल त्या प्रकल्पाला आयओडी दिली जावी, तसेच पुढील संबंधित परवानगीही दिल्या जाव्यात असे त्यांनी सांगितले.


'पालिकेनेही तेवढीच तत्परता दाखवायला हवी'

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून मुंबई महापालिकेने येथील रहिवाशांना माहुल येथील संक्रमण शिबिरांमध्ये स्थलांतरीत केले, तेवढीच तत्परता महापालिकेने हा प्रकल्प जलदगतीने होण्यासाठी दाखवायला हवी. या प्रकल्पाच्या रखडलेल्या सर्व परवानग्या देण्यासाठी महापालिकेने तत्परता दाखवायला हवी. जर ही तत्परता आधीच दाखवली असती तर हा प्रकल्प रखडला नसता आणि इमारत धोकादायक होऊन रहिवाशांना संक्रमण शिबिरात जाण्याची गरज भासली होती. त्यामुळे या प्रकल्पांतर्गत याच ठिकाणी संक्रमण शिबिर बांधले जावे. आणि जर तशी जागा नसल्यास १ किलोमीटरच्या क्षेत्रात मोकळ्या जागेत संक्रमण शिबिर बांधले जावे ही आपली प्रमुख मागणी असल्याचे नगरसेविका सोनम मनोज जामसूतकर यांनी स्पष्ट केले.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा