Advertisement

..तर, माहुलमधील सर्वांना परत आणा!


..तर, माहुलमधील सर्वांना परत आणा!
SHARES

मुंबई महापालिकेने माहुल वसाहतीत तात्पुरते पुनर्वसन केलेल्या ताडवाडीतील 21 जणांचा मृत्यू झाल्याचे सभागृह नेते यशवंत जाधव यांचे म्हणणे असेल, तर ही बाब गंभीर आहे. राज्यात आणि महापालिकेत त्यांची सत्ता आहे, त्यामुळे त्यांनी या वसाहतीतील 220 कुटुंबांना परत आणून त्यांचे ताडवाडीत पुनर्वसन करावे, असे आव्हान काँग्रेसचे माजी नगरसेवक मनोज जामसूतकर यांनी जाधव यांना दिले आहे. एवढेच नव्हे तर, माहुलमधील वसाहतीतील जर सर्वजण नरकयातना भोगत असतील, तर त्यांनाही तेथून अन्य वसाहतींमध्ये स्थलांतरीत करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

महापालिका सभागृहामध्ये नाल्यालगतच्या झोपडपट्टीमधील कुटुंबांचे पुनर्वसन माहुलमधील वसाहतीत केले जात असून ही जागा राहण्यास तसेच आरोग्याच्यादृष्टीने योग्य नसल्याचा मुद्दा भाजपाचे नगरसेवक संदीप पटेल यांनी उपस्थित केला. यावेळी झालेल्या चर्चेत सभागृह नेते यशवंत जाधव यांनी आपल्या माझगाव ताडवाडीतील 220 कुटुंबांचे पुनर्वसन माहुलमध्ये केल्याचे सांगत या कुटुंबातील 21 जणांचा मृत्यू झाल्याचा मुद्दा मांडला. पुनर्विकासाठी या कुटुंबांना हलवण्यात आल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला होता.


समितीच्या समाधानानंतरच कुटुंबांचे माहुलमध्ये पुनर्वसन

माझगाव ताडवाडीतील इमारत क्रमांक 14, 15 व 16 या इमारती धोकादायक झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार येथील 220 कुटुंबांना माहुलमधील वसाहतीत हलवण्यात आल्याचे जामसूतकर यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने बनवलेल्या समितीने माहुलमधील खोल्यांची पाहणी केली. त्यानंतर काही खोल्यांची त्यांनी सुधारणा करून घेतली. यावर कृती समितीच्या सदस्यांचे समाधान झाल्यानंतरच या कुटुंबांचे तेथे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. न्यायालयाच्या या समितीमध्ये वरिष्ठ कायदेतज्ज्ञ अशोक गुप्ता अध्यक्ष होते. यामध्ये न्यायालयाचे कायदेतज्ज्ञ, महापालिकेचे अधिकारी व कायदेतज्ज्ञ व ताडवाडी बचाव कृती समितीचे सदस्यही होते. बचाव कृती समितीचे समर्थक हे यशवंत जाधव यांचे होते.


यशवंत जाधवांमुळे ही कुटुंबे माहुलमध्ये

आज या सर्व कुटुंबांना माहुलमध्ये जावे लागले त्याला यशवंत जाधवच जबाबदार असल्याचा आरोप जामसूतकर यांनी केला आहे. या इमारती धोकादायक म्हणून जाहीर झाल्यानंतर लोकांना ही घरे खाली करून देण्याचे आदेश प्राप्त झाले, तेव्हापासून मार्च 2013 पासून आपण तत्कालीन आयुक्तांशी पत्रव्यवहार करून या कुटुंबांचे पुनर्वसन याच ठिकाणी संक्रमण शिबीर बांधून करावे, अशी मागणी केली होती. परंतु याठिकाणी संक्रमण शिबीर बांधून त्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्यास ताडवाडी बचाव कृती समितीने विरोध केल्यामुळेच आज ही कुटुंबे माहुलमध्ये गेल्याचे जामसूतकर यांनी म्हटले आहे.


आता जाधवांचा प्रकल्पाला विरोध का?

माझगाव ताडवाडी बीआयटी चाळींच्या पुनर्विकासाला एकप्रकारे यशवंत जाधव हेच खो घालत आहेत. पुनर्विकासासाठी नेमलेल्या पहिल्या कमिटीचे सेक्रेटरी हे खुद्द यशवंत जाधव होते. त्यांनीच विशेष प्रयत्न करत या इमारतीच्या पुनर्विकासासाठी विकासकाला मदत केली आहे. महापालिकेच्या सुधार समितीमध्ये तसेच सभागृहामध्ये माझगाव ताडवाडीच्या पुनर्विकासाचा प्रस्ताव मंजूर करून घेण्यासाठी यशवंत जाधव यांनी विशेष मेहनत घेतली आहे. त्यामुळे महापालिकेची मंजुरी असतानाही हा पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मदत न करता तो रखडवण्याच प्रयत्न करत एकप्रकारे महापालिकेचे नुकसान सभागृहनेते यशवंत जाधव यांच्याकडून होत असल्याचेही जामसूतकर यांनी म्हटले आहे.



हे देखील वाचा -

माहुल हा नरकच! इथे माणसेही चोरीला जातील... 



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा